आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुनर्वसन: सेनेत रिक्त जागा भरा अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेत कोणी बंडखोरी केली, कोणी पक्ष विरोधात काम केले तर कोणी नगरसेवक म्हणून विजयी झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांवर नवे पदाधिकारी येत्या पंधरा दिवसांत नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे या पक्षात सध्या रिकाम्या जागा भरा हेच अभियान सुरू आहे.
पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिला शहर संघटक मीरा देशपांडे यांनी राजीनामा दिला, मकरंद कुलकर्णी हे नगरसेवक म्हणून निवडून आले, पप्पू व्यास यांनी गुलमंडीवर बंडखोरी केली, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक विभागप्रमुख, शाखाप्रमुखांमध्येही असेच चित्र आहे. या सर्वांची नोंद घेत पक्षाने नवीन पदाधिकारी नियुक्त करण्याचे ठरवले आहे. ही प्रक्रिया सुरू असून येत्या १५ दिवसांत नवे पदाधिकारी नियुक्त केले जातील, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना पदे दिली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एक व्यक्ती एक पद या न्यायाने जे नगरसेवक झाले, त्यांच्या जागेवर संघटनेत दुसऱ्या कार्यकर्त्याला स्थान दिले जाणार आहे. पुढील चार वर्षे आता कोणत्याही निवडणुका नसल्याने नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान देऊन बळकटी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान मिळणार असल्यामुळे पक्षात उत्साह वाढेल, असा होरा आहे.
शहरप्रमुखांचा निर्णय मातोश्रीवरूनच
पालिकानिवडणुकीनंतर शहरप्रमुखांबरोबरच जिल्हाप्रमुखही बदलले जाण्याची शक्यता पक्षात वर्तवण्यात येत आहे. मात्र, तूर्तास स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर जिल्हा शहरप्रमुखांचे खांदेपालट किंवा बदलाचा निर्णय मातोश्रीवरूनच होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याचाच अर्थ किमान महिनाभर तरी जिल्हाप्रमुख तसेच शहर प्रमुखांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...