आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार प्रचारकासाठी शिवसेनला नाकी नऊ, नोहर जोशींच्या सभांना मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्टार प्रचारक मिळवताना शिवसेनेला नाकी नऊ येत आहेत. यामुळे मनोहर जोशी, लीलाधर डाके यांच्यासारख्या अडगळीत टाकलेल्या नेत्यांना सभांची धुरा सांभाळावी लागणार आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे तीनही मतदारसंघांत रोड शो घेण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे.
बहुतेक बडे नेते आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वत: रिंगणात उतरले आहेत. त्यात पुन्हा एकाच दिवशी राज्यभर मतदान होणार असल्याने बड्या नेत्यांना राज्यात इतरत्र प्रचाराला जाण्याची संधीच मिळणार नाही. परिणामी शिवसेनेत उद्धव ठाकरे, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी, राष्ट्रवादीत शरद पवार या नेत्यांना राज्यभर दौरे करावे लागत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. येत्या ७ आॅक्टोबरला औरंगाबादेत त्यांची जाहीर सभा होत आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे व फोडाफोडीमुळे शिवसेना अडचणीत असतानाच ४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे. त्यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्याची संधी ठाकरे यांना मिळणार असल्याने शिवसेनेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
डॉ. कोल्हेंचे आकर्षण
6 तारखेनंतर प्रचारासाठी स्टार प्रचारक कोणाला आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रामदास कदम स्वत:च्या निवडणुकीत गर्क असणार आहेत. म्हणून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे पाटील, आदेश बांदेकर यांना जिल्ह्यात मागणी आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके या ज्येष्ठ नेत्यांच्या सभांनाही मागणी असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच दिवाकर रावते, संजय राऊत यांच्या सभाही उमेदवारांनी मागितल्या आहेत. आदित्य ठाकरे यांचे पूर्व, मध्य व पश्चिम मतदारसंघांत रोड शो होतील.