आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने वाढवलेलेच आता प्रचारामध्ये विरोधात उतरले - पालकमंत्री कदमांचा टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - त्यांना शिवसेनेने वाढवले. सत्तेची फळेही दिली. त्यांनी फायदा करून घेतला आणि आता स्वार्थासाठी भाजपमध्ये दाखल झाले. आता तेच सेनेच्या विरोधात भाजपसाठी मते मागताहेत. अशा हौशा-गवशांना त्यांची जागा दाखवू, अशा शब्दांत पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना सोडून भाजप, काँग्रेसमध्ये गेलेल्यांना टोला लगावला. त्यांच्या बोलण्याचा सूर लक्षात घेता त्यांचे लक्ष्य हे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी होते.
सातारा-देवळाईच्या दोन वॉर्डांच्या निवडणुकीच्या प्रचाराला शनिवारी सुरुवात झाली. सेना उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार तथा उपनेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, महापौर त्र्यंबक तुपे, पालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, माजी महापौर कला ओझा, नगरसेवक नंदकुमार घोडेले, सिद्धांत शिरसाट, देवळाईचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे, साताऱ्याच्या उमेदवार पल्लवी गायकवाड आदी उपस्थित होते.

भाषणाची सुरुवातच कदम यांनी बंडखोरांचा उल्लेख करत केली. सातारा तसेच देवळाई वॉर्डात सध्या भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत तेही सेनेतूनच गेले आहेत. त्यांचाही उल्लेख त्यांनी या वेळी केला आणि या गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहनही केले. सातारा देवळाईसाठी जिल्हा नियोजन समितीतून मी निधी दिला असल्याने मला येथे येऊन मतदान मागण्याचा अधिकार असल्याचेही कदम या वेळी म्हणाले. सातारा-देवळाई या गावांची स्वतंत्र नगर परिषद व्हावी, अशी काहींची इच्छा होती. परंतु या परिसराचा विकास महानगरपालिकाच करू शकते, असा दावा खासदार खैरे यांनी केला. काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी नगर परिषद व्हावी म्हणून थेट न्यायालयात गेले होते, परंतु तेथे त्यांची डाळ शिजली नाही. आता महानगरपालिकेमार्फत येथे विकास करण्यासाठी आम्ही निधी आणू, असा दावा त्यांनी केला. या वेळी राजेंद्र राठोड, रमेश बाहुले, प्रवीण मोहिते, शिवाजी शिंदे, शिवाजी हिवाळे, रंजना कुलकर्णी, कैलास पाटील, राजेश जंगले, दिनेश राजे भोसले, रंजित ढेपे आदींची उपस्थिती होती.

जैस्वाल कुठेही जाणार नाहीत
कदम भाषणाला उभे असताना त्यांच्या नजरेस माजी आमदार जैस्वाल पडले नाहीत. कदम यांची नजर जैस्वाल यांना शोधत होती. ते दिसले नाहीत तेव्हा कदम म्हणाले, ‘आमचे दुसरे जिल्हाप्रमुख जैस्वाल कोठे आहेत? ते कोठेही जाणार नाहीत, आपलेच आहेत, आपल्याकडेच राहतील,’ अशा शब्दांत जैस्वालांनाही टोला लगावला.

खैरे म्हणाले, आता थेट केंद्राचाच निधी आणतो
खासदार खैरे यांनी नेहमीप्रमाणे या परिसराच्या विकासासाठी मी निधी आणणार, असे वक्तव्य केले. आधी केंद्राकडून निधी आणतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर थोडीशी माघार घेत राज्य शासनाकडूनही निधी मिळवू, असे ते म्हणाले.
पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांवर पालकमंत्री रामदास कदम यांनी टीकास्त्र सोडले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. छाया : दिव्य मराठी