आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींना जाब विचारत शाई अंगावर फेकली; वैजापूर बाजार समितीत शिवसेनेचा राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- बाजार समितीचे सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या चेहऱ्याला शिवसेनेच्या सहा संचालकांनी सोमवारी शिवसेना स्टाइलने काळे फासले. बाजार समितीच्या मासिक सभेच्या कामकाजादरम्यान सभागृहात  शिवसेनेच्या संचालकांनी अचानक आक्रमक भूमिका घेत हा खळबळजनक प्रकार केला. 


बाजार समितीच्या सभागृहात सभापती काकासाहेब पाटील याच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना सेनेच्या संचालकांनी सभापती काकासाहेब पाटील यांना बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र काढण्याची भूमिका का घेतली तसेच अवाजवी आर्थिक घोटाळ्याचा खुलासा करण्याची जोरदार मागणी करत धक्काबुक्की केली. त्यादरम्यान घडलेल्या वादातून शिवसेनेचे उपसभापती राजेंद्र चव्हाण, संचालक संजय निकम, सुरेश आल्हाट, दिगंबर खंडागळे, विष्णू जेजूरकर यांनी सभापती पाटील यांच्या चेहऱ्यावर थेट काळी शाई फेकली. हा प्रकार घडल्यानंतर बाजार समितीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांचा ताफा दाखल झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान याप्रकरणात अद्याप वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार न आल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

 

...तर आपोआप सभापतिपद संपुष्टात येणार 

येथील बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील हे रामकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे थकबाकीदार, कर्जदार असल्याने त्यांना दहेगाव सोसायटीच्या संचालक पदावरून अपात्र ठरवावे, अशी मागणी शिवसेनेचे बाजार समितीचे संचालक सुरेश आल्हाट यांनी सहकार खात्याकडे केली आहे. बाजार समिती सभापती काकासाहेब पाटील हे दहेगाव सोसायटीचे संचालक आहेत. त्यांच्याकडे मागील दहा वर्षांपासून रामकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे थकीत कर्ज आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार थकीत कर्जदार हा कुठल्याही संस्थेचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. त्यामुळे सहायक निबंधक एफ. बी. बहुरे यांनी काकासाहेब पाटील यांना नोटीस बजावली असून ते अपात्रता धारण करीत असल्याचे दिसून येत आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना बाजू मांडण्यासाठी २० डिंसेबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काकासाहेब पाटील यांचे दहेगाव सोसायटीचे संचालकपद धोक्यात आले असून तेथून पाय उतार झाल्यानंतर आपोआपच त्यांचे बाजार समितीचे सभापतिपद संपुष्टात येणार आहे.

 

सभापतीने आर्थिक घोटाळा केला : सेनेच्या संचालकांचा आरोप   
बाजार समितीच्या सभागृहात सभापती काकासाहेब पाटील याच्या अंगावर शाई फेक केल्यानंतर सेनेच्या संचालक संजय निकम यांनी सभापती काकासाहेब पाटील यांनी बाजार समितीत पाच लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. मासिक बैठकीदरम्यान सभापतींना या खर्चाचा खुलासा करावा, अशी मागणी सेनेच्या संचालकांनी केल्यामुळे चिडलेले सभापती काकासाहेब यांनी आमच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे सेनेच्या सर्व संचालकांनी त्यांना अद्दल घडविली असल्याची प्रतिक्रिया दिली. 

 

सेनेचा भ्याडपणाचा हल्ला : सभापती काकासाहेब पाटील
सेनेच्या संचालकांनी मासिक  सभेदरम्यान अंगावर शाई टाकून केलेला हल्ला हा भ्याडपणाचा आहे. मागील महिन्यात सेनेच्या संचालकांनी माझ्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव उधळल्यामुळे सेनेचे संचालक बाजार समितीच्या कामकाजात मुद्दाम अडथळा निर्माण करण्याचा प्रकार करत आहेत. सभापतिपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळात एक रुपयाचा आर्थिक घोटाळा केलेला नाही.आर्थिक घोटाळा केला असल्यास सेनेच्या संचालकांनी पुराव्यानिशी उघड करावे, असे आव्हान त्यांनी सेनेच्या संचालकांना दिले.

बातम्या आणखी आहेत...