आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाई देवी यात्रोत्सव : बारा गाड्यांवर रेवड्यांची उधळण करत वगदी मिरवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना- अजिंठा लेणीपासून अवघ्या नऊ किमी अंतरावरील सिल्लोड तालुक्यातील येथील ग्रामदैवत कुलस्वामिनी श्री शिवाई देवीचा यात्रोत्सव बुधवार, दि. १२ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची पूर्वतयारी म्हणून मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी  पाणीपुरवठ्यासह  नियोजन केले आहे.  

मंदिर परिसरात दुकानदारांसाठी बैठक व्यवस्था, वाहनतळ आदींबाबत गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. बुधवारी सकाळी आठ ते दोनपर्यंत बारा गाडे ओढून नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता रेवड्यांची उधळण करत वगदी मिरवणूक काढण्यात येईल. यात्रेत मल्लखांब खेळण्यांसह वाघ्या मुरळी, तगतराव आदी कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण असणार आहे. रात्री आठच्या सुमारास गावातून बालाजी मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवारी (दि. १३) ते सोमवार (दि. १७)पर्यंत पाच दिवस दररोज सायंकाळी सात वाजता  महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.   

अशी आहे आख्यायिका  
सुमारे आठशे वर्षांपूर्वी शिवना या गावाचे नाव शिवपूर होते. गावाच्या उत्तरेस पाच किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत शहादरी नावाचे छोटेसे गाव वसलेले होते. बहुतेक गवळी, गुराख्यांची वस्ती असलेल्या या गावातून शिवा नावाचा गवळी रोज दही, दूध, घेऊन येथे विक्रीसाठी येत असे. 
 
गावालगतच्या खोलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर दही वाहून तो दर्शन करून जात असे. या नित्यक्रमात त्याने कधीही खंड पडू दिला नाही. शिवाला संतती नसल्यामुळे मात्र तो सदैव दु:खी असे. एक दिवस शिवा असाच व्याकूळ होऊन दर्शन घेत असताना त्यास भोलेनाथ प्रसन्न झाले व त्यांनी वर मागावयास सांगितले.  शिवाने संततीसुख मागितले. महादेवाने तथास्तु म्हटले. पण एक अट टाकली की, तुला मुलगी होईल; पण ती जास्त दिवस तुझ्या सान्निध्यात राहणार नाही. एका वर्षानंतर शिवा गवळ्याच्या सौभाग्यवतीने एका गोंडस मुलीस जन्म दिला.

मुलीच्या जन्माने शिवा खूप आनंदला. मोठ्या उत्साहाने तिचे नामकरण “ शिवाई’ असे केले.  सहा वर्षांनंतर मुलगी जेव्हा चालायला लागली तेव्हा शिवा तिला घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी आला. शिवाईने बाबांना सांगितले की, तुम्ही दूध- दही विकून परत या . मी मंदिरात थांबते . शिवाने होकार दिला. तो चार-पाच पावले पुढे गेला व मागे वळून पाहिले तर शिवाई गुप्त झाली. तिथेच शिवाईचे भव्य व सुंदर असे मंदिर उभारले गेले. शिवाईच्या नावावरून या गावचे नाव शिवना असे पडल्याची आख्यायिका आहे.
बातम्या आणखी आहेत...