आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवाई’कडे मनपाचे १४ लाख भाडे थकीत, कडक भूमिका घेण्याची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाकडून नाल्यावरची जागा लीजवर घेऊन उभारण्यात आलेले औरंगाबादचे शिवसेना भवन अर्थात शिवाई ट्रस्टच्या इमारतीचे भाडे सहा वर्षांपासून मनपाला भरण्यात आलेले नाही. भाड्याच्या थकीत रकमेचा आकडा १४ लाख रुपयांवर पोहोचला असून सत्ताधारी शिवसेनेकडून भाडे वसुली करायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

विरोधी पक्षनेते जहांगीर खान यांनी गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत नाल्यांवरील मनपाच्या लीजवर देण्यात आलेल्या जागांच्या माध्यमातून किती भाडे वसूल केले जाते, असा प्रश्न विचारला होता. त्यावरील लेखी उत्तर उपायुक्तांनी (मालमत्ता) खान यांना पाठवले आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या ‘शिवाई’वर मालमत्ता विभाग मेहेरनजर करत असल्याचे समोर आले आहे. उत्तरानुसार मनपाने अशा जागा लीजवर दिल्या आहेत. यापैकी १९७५ पासून लीजवर देण्यात आलेल्या बाॅम्बे मर्कंटाइल बँकेच्या जागेचे भाडे तेवढे नियमित भरले गेल्याचे समोर आले आहे. बाकीच्या आठपैकी टिळकपथवरील मराठा समाज सेवा मंडळाला दिलेल्या जागेचे भाडे २०११ नंतर भरण्यात आलेले नाही. औषधी भवनाच्या बाबतीत तर भाडे किती आहे, तेही सांगण्यात आलेले नाही भाड्यासंबंधीची फाइल २००८ पासून नगररचना विभागाकडे असल्याचे म्हटले आहे. या फाइलचे पुढे काय झाले ते माहीत नाही.

शिवसेनेमुळे गुपचूप
औरंगपुऱ्याच्या नाल्यावरील १२२० चौरस मीटर जागा शिवाई सेवा ट्रस्टला २००० मध्ये ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे.
पैकी १५ वर्षे संपली आहेत. त्यातही या ट्रस्टने त्यांना दरसाल देय असलेले लाख ३४ हजार २४० रुपये भाडे २००९ पर्यंत नियमित भरले. पण नंतर मात्र ‘शिवाई’ने एक रुपया भरलेला नाही. वर्षांची थकबाकी आता १४ लाख हजार ४४० रुपयांपर्यंत पोहोचली. करवसुलीसाठी कडक भूमिका घेण्याची घोषणा करणाऱ्या त्यावर २४ टक्के व्याज आकारणी करणाऱ्या मनपाने शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा समावेश असलेल्या शिवाई ट्रस्टकडून वसुली करण्याबाबत कारवाई केलेली नाही. सत्ताधारी शिवसेनेचा संबंध असल्याने मनपाचे हक्काचे उत्पन्न असलेल्या १४ लाखांवर पाणी सोडले जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.