आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस आॅडिट करणाऱ्यालाच दिले ‘अग्निशमन’चे प्रमुख पद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘कारवाई’चा अहवाल तातडीने मागवल्याचा निरोप मिळाल्यामुळे अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना रात्री उशिरा निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ज्यांनी धादांत बाेगस फायर आॅडिट रिपोर्ट दिला, त्या स्टेशनमास्तर जाफर खान यांनाच या विभागाच्या प्रमुखपदाचा भार सोपविण्यात आला आहे.
शनिवारी लागलेल्या आगीत फटाका मार्केट जळून खाक झाले. तिथे प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना नसल्याचे समोर आल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना या संदर्भात कारवाईचा आग्रह धरला. मात्र, दिवाळी संपल्यानंतर निलंबनाची कारवाई होईल, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पत्रकारांना सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा अहवाल तातडीने मागितल्याने रात्रीच ती कारवाई करण्यात आली, असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

रविवारी सकाळी मुंबईच्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संस्थेचे उपनियंत्रक सौमित्र रायचौधरी यांच्या पथकाने औरंगाबादेत येऊन घटनास्थळाची पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली, यात काही घातपात आहे का, याचा तपास करण्यासाठी हे पथक आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. हे अधिकारी लवकरच आपला अहवाल सादर करणार आहेत.

मुद्देमाल नेण्याचे आवाहन
घटनेचा पंचनामा झाला असून ज्यांची वाहने जळाली आहेत, त्यांनी कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवून वाहने घेऊन जावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आरटीओने चेसीस नंबरनुसार नोंद केली आहे. दरम्यान, या आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकांना पालिकेतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा महापौर त्र्यंबक तुपे यांनी रविवारी केली.

बातम्या आणखी आहेत...