मुंबई - विधान परिषदचे सभापती म्हणून
काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून गुरुवारी होणार्या विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब होईल. विशेष म्हणजे शिवाजीरावांची बिनविरोध निवडीची ही हॅट्ट्रिक ठरणार आहे. यापूर्वी 13 आॅगस्ट 2004 व 25 एप्रिल 2008 रोजी झालेल्या निवडणुकीत ते बिनविरोध सभापती म्हणून निवडून आले होते.
अर्ज करण्याची मुदत 7 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत होती. देशमुखांचे नाव सुचवणारे 4 अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या अर्जावर सूचक अनुमोदक म्हणून मुख्यमंत्री व माणिकराव ठाकरे यांच्या सह्या आहेत. दुसर्या अर्जावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले व किरण पावसकर, तिसर्या अर्जावर काँग्रेसचे संजय दत्त व हरिभाऊ राठोड, तर चौथ्या अर्जावर काँग्रेसचे शरद रणपिसे व अपक्ष आमदार विजय सावंत यांच्या सह्या आहेत.
13 जागा रिक्त
विधान परिषदेची सदस्य संख्या 78 असून त्यातील 13 जागा रिक्त आहेत. 13 पैकी 12 रिक्त जागा नामनियुक्त सदस्यांच्या असून एक जागा अपक्ष मनीष जैन यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी आहे, तर उर्वरित 65 सदस्यांची पक्षनिहाय संख्या राष्ट्रवादी काँग्रेस 22, काँग्रेस 17, भाजप 10, शिवसेना 7, लोकभारती 1, शेतकरी कामगार पक्ष 1 व अपक्ष 7 अशी आहे.