आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मे पश्चिम युतीकडे, सेनेचा वरचष्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत भाजप व एमआयएमच्या वादळातही कायम राहिलेला औरंगाबाद पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला थोडा ढासळला असला, तरी येथे यंदाही सेनेनेच वरचष्मा ठेवला आहे. पश्चिम मतदारसंघातील २८ वाॅर्डांपैकी दहा वाॅर्ड सेनेकडे, तर ४ वाॅर्ड भाजपकडे गेले आहेत. याशिवाय बंडखोरांमुळे आठ वाॅर्डांत सेना व भाजपला फटका बसला असून तेथील त्यांचा मताचा वाटाही कमी झाला आहे.
दुसरीकडे एमआयएमने भाजपएवढ्याच चार जागा व राष्ट्रवादीने दोन जागा घेत युतीसमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिमने भाजपच्या लाटेतही शिवसेनेलाच साथ दिली होती व तेथे संजय शिरसाट यांना आमदार केले होते. त्या वेळी भाजप १४ वाॅर्डांत आघाडीवर होते. यंदा किमान तेवढ्या जागा जिंकण्याची भाजपला आशा होती, तर शिवसेनेला किमान १५ जागा जिंकण्याची आशा होती; पण तसे झाले नाही व शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळत असल्याचे समोर आले आहे.
हक्काच्या जागा गेल्या

एकनाथनगर, पडेगाव, कोकणवाडी, विष्णूनगर या जागा शिवसेना व भाजप युतीला मिळू शकल्या असत्या असे चित्र होते, पण बहुतेक ठिकाणी बंडखोरांनी ताकद लावत युतीचे खासकरून सेनेचे मनसुबे धुळीला मिळवले. एकनाथनगरात भाजप बंडखोराने ८०७ मते घेतली व तेथे सेनेच्या शोभा सूर्यवंशी यांना ८५२ मतांनी पराभव पत्करावा लागला, तेथे एमआयएमचा उमेदवार विजयी झाला.
पडेगावात तर चक्क एमआयएमने मतविभाजनाचा फायदा घेत जागा पटकावली, कोकणवाडीतही दलित व मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणामुळे शिवसेनेला फटका बसला. विष्णूनगरही बंडखोरीमुळे युतीच्या हातून गेले. देवानगरीत ऐनवेळी भाजप उमेदवार साधना सुरडकर यांनी माघार घेत केलेली नाचक्की तेथे भाजप समर्थक अपक्ष उमेदवार निवडून आणत कमी झाली, पण मयूरबन काॅलनीत सेना समर्थित अपक्षाने भाजपच्या उमेदवाराला दणका दिला. बसपनेही दोन जागा घेत प्रथमच शिरकाव केला, तर राष्ट्रवादीने आपली संख्या या मतदारसंघात एकाने वाढवली.
सेनेचे नेटवर्क खिळखिळे

विधानसभा निवडणुकीपासून पश्चिममधील शिवसेनेचे बळ कणाकणाने घटत असल्याचे जाणवत होते. ते याही निवडणुकीत जाणवलेच. आमदार संजय शिरसाट आपल्या मुलाच्या राजकीय लाँचिंगमध्येच व्यग्र राहिल्याने इतर वाॅर्डांत व्यूहरचना करताना त्यांची तारांबळ उडाल्याचे जाणवले. शिवाय पश्चिमचे शहरप्रमुख राजू वैद्य स्वत:च विद्यानगरच्या लढाईत अडकल्याने ते पक्षाची यंत्रणा हाताळू शकले नाहीत, त्याचाही फटका शिवसेनेला बसला.
भाजपत आनंदी आनंदच

भाजपमध्ये आमदार अतुल सावे यांच्याकडे पूर्व व पश्चिम मतदारसंघांची जबाबदारी होती. ते पूर्वचे आमदार असल्याने त्यांनी तिकडे अधिक लक्ष पुरवले. परिणामी, पश्चिममध्ये पक्ष वाऱ्यावर सोडल्यासारखाच होता. विजया रहाटकर यांनी काही काळ प्रचाराचा भार हाताळला तेवढाच. बाकी भाजपचे उमेदवार मोदी पुण्याईच्या अजूनही असलेल्या लाटेवर व ब्राह्मण-मध्यमवर्गीय मतदारांच्या जिवावर निवडणूक लढत होते.
एमआयएम, बसपचा शिरकाव

या निवडणुकीत एमआयएमने पश्चिममधील मुस्लिमबहुल वाॅर्डांत यश मिळवण्याऐवजी दलितबहुल वाॅर्डांत आश्चर्यकारक यश मिळवले. एकनाथनगर व क्रांतीनगर हे दोन वाॅर्ड त्यांनी पटकावले, तर बसपनेही भाजपचा रमानगर हिसकावून घेतला व कबीरनगरातही मुसंडी मारली.