आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने सुरू केली महापौर निवडणुकीची मोर्चेबांधणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील वेळी महापौरपदाच्या निवडणुकीत मदत करणार्‍या अपक्ष तसेच मनसेच्या सदस्यांना शिवसेनेकडून न्यायदान करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पाचपैकी तीन ठिकाणी या मदतगारांना बसवण्यात आले आहे.
पाच महिन्यांवर पुन्हा महापौरांची निवडणूक आल्यामुळे शिवसेनेने हे धोरण स्वीकारले असले तरी महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतिपद मात्र स्वत:कडेच ठेवले आहे. महिला व बालकल्याण, आरोग्य, शहर सुधार, गलिच्छ वस्ती सुधार आणि शालेय समितीच्या सभापतिपदांसाठी शनिवारी निवडणूक झाली. महिला व बालकल्याण समितीसाठी काँग्रेसकडून रेखा जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
पराभव समोर दिसत असतानाही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांना काँग्रेस सदस्यांची दोन मते मिळाली. राष्ट्रवादीचे सदस्य मतदानाला आले नव्हते. हा अपवाद वगळता अन्य समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेकडून रिपाइं (डी) च्या पुष्पा निलपगारे (महिला व बालकल्याण), मनसेचे राजगौरव वानखेडे (शहर सुधार) आणि अपक्ष ज्योती खिल्लारे (गलिच्छ वस्ती सुधार) या तिघांना सभापतिपदी विराजमान होण्याची संधी दिली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी सावित्रीबाई वाणी तर शिक्षण समितीच्या सभापतिपदावर ज्ञानोबा जाधव या शिवसैनिकांना संधी मिळाली. भाजपकडून बबन नरवडे यांना आरोग्य समितीचे सभापतिपद मिळाले.
युतीला मदत करणार्‍या अपक्षांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाबरोबरच विविध विषय तसेच प्रभाग समित्यांच्या सभापतिपदावर संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. गेल्या वर्षी एका अपक्षाला संधी देण्यात आली होती.
आणखी पाचच महिन्यांनी या सदस्यांकडे मतदान मागण्यासाठी जावे लागणार असल्याची कल्पना आल्यामुळे या वेळी पाचपैकी तीन समित्यांचे सभापतिपद अपक्ष तसेच मनसेच्या नगरसेवकांना देण्यात आले आहे.