आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात राज्यस्तरीय स्पर्धेची मेजवानी, घडणार शिवकालीन युद्धकलांचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दांडपट्टा, लाठी-काठी, भाला, तलवार हे शब्द ऐकल्यावर शिवरायांचा काळ आठवतो. शिवाजी महाराजांनी लढायांमध्ये गनिमी कावा या शस्त्राचा वापर करत अनेक शत्रूंना पराभूत केले. हीच शिवकालीन युद्धकला आता औरंगाबादेतही पाहायला मिळणार आहे. शिवकालीन युद्धकला प्रसारक क्रीडा मंडळातर्फे 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मैदानावर राज्यस्तरीय शिवकालीन युद्धकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईनंतर राज्यात दुसर्‍यांदाच
ही अनोखी स्पर्धा यापूर्वी मुंबई येथे घेण्यात आली. वाशी येथील छावा शिवकालीन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहिल्यांदा अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात आली. शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धकला बहुतांश लोकांना माहीत नाही. त्याचा प्रसार होण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा मुंबईनंतर औरंगाबादला पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्याचे गोरक्षनाथ कुंडलवाल यांनी सांगितले.

दिग्गज संघांचा सहभाग
महाराष्ट्रातील दिग्गज संघ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पुणे, फलटण आणि अलिबाग येथील संघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील संघही सहभागी होणार आहेत. विजयी संघाला तीन फूट उंचीचा चषक प्रदान केला जाईल. तसेच उपविजयी आणि तिसर्‍या क्रमांकावरील संघालाही चषक देण्यात येईल. प्रत्येक सहभागी संघाला आयोजकांतर्फे 5 हजार रुपये मानधनही दिले जाणार आहे.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांची पर्वणी
या स्पर्धेत अनेक चित्तथरारक खेळ औरंगाबादकरांना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये लाठी-काठी, कुर्‍हाड, भाला, तलवार, विटा, चाकूचे लढाईचे डाव, बाणा, बनाटी, 16 गोळ्यांचे पेटते चक्र फिरवणे इत्यादी र्मदानी खेळ प्रकारांचा समावेश आहे.

युद्धकला जिवंत ठेवणे हाच उद्देश
शवकालीन युद्धकला लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्याच्या आणि लोकांना त्याची माहिती करून देण्याच्या उद्देशानेच ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत. मनोज जैस्वाल यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आहे. आणखी प्रायोजकांच्या आम्ही शोधात आहोत.
गोरक्षनाथ कुंडलवाल, संस्थापक, शिवकालीन युद्धकला व क्रीडा मंडळ