आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांना श्रेय देण्यात सेना-भाजप नगरसेवकांत स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपापल्या राजकीय गाॅडफादरना श्रेय देण्यात शिवसेना भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांत चढाओढ लागल्याचे चित्र सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. सेनेच्या नंदकुमार घोडेले यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून केंद्राचा निधी आणता येईल, असे सांगताच भाजपचे सभापती दिलीप थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आमदार अतुल सावे यांच्या शहराबाबतच्या कामाचा आवर्जून उल्लेख करीत ही शर्यत आणखीच वाढवली.

कचऱ्याच्या विषयावर सविस्तर ऊहापोह होत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले बोलायला उभे राहिले. १२५ वाहनांसाठी राज्य सरकारने निधी नाकारलाच तर तो केंद्राकडून आणता येईल. खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून त्यासाठी प्रयत्न करू. खासदार खैरे यांनी समांतर भूमिगतसाठी निधी आणला आहे वगैरे स्तुतिसुमने उधळली. यामुळे भाजपच्या गोटात हालचाल झाली. घोडेले यांनी आपले बोलणे संपवले. नंतर आणखी काही नगरसेवकांनी भाषणे केली नंतर स्थायी समिती सभापती दिलीप थोरात उभे राहिले. त्यांनी केंद्र राज्याकडून विविध योजनांचे पैसे आणण्यासाठी एक विशिष्ट अधिकारीच नेमावा, अशी मागणी केली. हे बोलतानाच त्यांनी खासदार खैरे जसे शहराला निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत तसे आमचे प्रदेशाध्यक्षही प्रयत्न करीत आहेत. रावसाहेब दानवे यांनी तर मनपाला तुम्ही प्रस्ताव तयार करून आणा, मी निधी उपलब्ध करून देतो, असे स्पष्टच सांगितल्याचे ठासून सांगितले.

आधी घोडेले यांचे खैरे कौतुक आणि नंतरचे दानवे कौतुक झाल्यावर उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आमदार अतुल सावे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा जो १२५ वाहने खरेदीचा प्रस्ताव आणला आहे तो आमदार सावे यांच्या प्रयत्नामुळेच आला आहे. आमदार सावे यांनी मुख्यमंत्र्यांशी शहराच्या प्रश्नांबाबत चर्चा केली होती. त्या वेळी हा विषय निघाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने निधी दिला नाही तर हा प्रश्नच नाही, असे सांगत त्यांनी आपलीही स्तुतिसुमने सभागृहात सादर केली.

आपापल्या राजकीय गाॅडफादरना श्रेय देण्याचा हा प्रकार सुरू असताना नेमके सभागृह नेते राजेंद्र जंजाळ सेनेचे इतर नगरसेवक हजर नव्हते.त्यामुळे कोणी पालकमंत्री रामदास कदम यांचे नाव काढले नाही. ते असते तर कदम यांनाही काही बाबींचे श्रेय दिलेच असते, असे नंतर बोलले जात होते.
नगरसेवकांची चढाओढ पाहून आयुक्त केंद्रेकरही अवाक् झाले.

"समांतर'ला नोटीस दिली, काय करावे तुम्हीच सांगा
विषयपत्रिकेत नगरसेवक रावसाहेब आमले यांनी पाणीपट्टीच्या दरवाढीचा विषय ठेवला. त्यावर चर्चा करताना उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक राज वानखेडे, राजू वैद्य, मतीन सय्यद यांनी कोल्हे यांच्यावर तुम्ही आतापर्यंत समांतरला किती पैसे खर्च केले? त्यांनी काय काम केले? पाणीपट्टी कशी वाढली? अशा प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर कोल्हे म्हणाले, समांतरला १०२ कोटी १२ लाख ९० हजार ४८३ रुपये दिले. तसेच कंपनीने कामास विलंब केल्याने त्यांना नोटीसही बजावण्यात आली. त्यावरही नगरसेवकांचे समाधान झाल्याने महापौर त्र्यंबक तुपे यांनी केवळ नोटीस देऊन संपते का? अशी विचारणा केली असता आता यापुढे काय करावे तुम्हीच सांगा, असे म्हणत कोल्हेंनी हा विषय संपवला.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी कर्ज असणाऱ्या जागेच्या मोबदल्यात आणि १२ मीटरऐवजी थेट २४ मीटरचा टीडीआर दिल्याचा आरोप नगरसेवक नितीन चित्ते यांनी केला. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी अधिकाऱ्यांना दिले. वानखेडे आणि चित्ते यांनी नगरविकास विभाग चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे दाखले देऊन चौधरी नावाच्या व्यक्तीला १२ ऐवजी २४ मीटरचा टीडीआर वाटप केल्याचे सांगितले. यावर नगरविकास विभागाचे ए. बी. देशमुख म्हणाले, संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. शिवाय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...