आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Ask Rto About Increasing Private Bus Fare

खासगी बस मालकांच्या मनमानीला आळा घाला, कारवाईचे आरटीओचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खासगी बससेवा देणार्‍या यंत्रणेकडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. सणासुदीत प्रवाशांची मोठी लूट होते. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपेक्षा दहा ते पंधरा टक्के अधिक रक्कम घेत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिले. शिवसेनेने या प्रश्नावर गुरुवारी दुपारी आरटीओ कार्यालयावर धडक देऊन अधिकार्‍यांना निवेदन दिले आणि प्रवाशांची लूट थांबवण्याची मागणी केली.

प्रत्येक तासाच्या बुकिंगवर खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांचे 500 ते 1 हजार रुपये लाटले जातात. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. गाड्यांमध्ये एसी सुविधा असल्याचे सांगितले जाते. प्रवास सुरू होण्यापूर्वी लावलेले एसी प्रवासादरम्यान बंद केले जातात. मात्र, प्रवासी तक्रार करीत नसल्याचा फायदा घेतला जातो, अशी तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांना निवेदन देऊन प्रवाशांची लूट थांबवण्याची मागणी त्यांनी केली. वर्मा यांनी तातडीने पथकांची स्थापना करून खासगी बसविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिवाय शहरात रिक्षाचालक मीटरनुसार प्रवासी घेत नाहीत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. शिवाय विविध वाहनांवर भाऊ, काका, दादा अशा विचित्र नंबरप्लेट लावणार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, पूर्वचे शहरप्रमुख संतोष जेजुरकर, पश्चिमचे शहरप्रमुख राजू वैद्य, मध्यचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, किशोर कच्छवाह, शिवा लुंगारे, गणपत खरात, संतोष खेंडके, हिरा सलामपुरे, कमलाकर जगताप, वसंतभाई शर्मा, संदेश कवडे, चंद्रकांत इंगळे यांचा सहभाग होता.