आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा खटाटोप, पुत्राच्या वाॅर्डातील मंदिरे वाचवण्यासाठी नेत्‍याची मनपा वकिलाकडे धावाधाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- मंदिरे अधिकृत असो वा अनधिकृत, शिवसेनेसाठी हा मुद्दा कायम राजकीय ध्रुवीकरणाकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला गेला अाहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अग्रेसर असलेली शिवसेना अाता धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटाव मोहिमेत बॅकफूटवर अाल्याचे दिसते. सर्वांच्या वाॅर्डांतील पडली तरी चालतील, पण पुत्राच्या वाॅर्डातील मंदिरे वाचवा, अशी याचना स्थानिक लोकप्रतिनिधी मनपा वकिलांकडे करत अाहेत. दुसरीकडे, सेनेसाठी मजबूत माहिती मांडणारा वकील शोधणेदेखील नेत्यांना कठीण होऊन बसले अाहे.
 
अनेक वर्षांपासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यासंबंधीची लढाई न्यायालयात सुरू आहे. याबाबत याचिका सुनावणीस आल्या, अनेक याचिकांमध्ये आदेशही झाले. परंतु तीस वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाला यासंबंधी कारवाई करावी असे वाटले नाही. प्रश्न कायम रेंगाळत ठेवल्याने अतिक्रमणांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच गेली. यासंबंधी सर्वसाधारण सभेत ठराव करायचा, परंतु कारवाई मात्र करायचीच नाही. हा पाठशिवणीचा खेळ अनेक वर्षांपासून सुरू आहे.
 
धार्मिक स्थळांसंबंधी खटाटोप : धार्मिकस्थळांसंबंधी हायकोर्टात याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्यास सांगणे, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देऊन धार्मिक स्थळांना संरक्षण देण्याची मागणी करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. मुख्यमंत्री अथवा केंद्रीय गृहमंत्री न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करील हे समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन झाले नाही हेच हायकोर्टाने सांगितले. न्यायालयीन लढाई केवळ निवेदन देऊन लढता येत नाही. त्यासाठी न्यायालयात सक्षम वकील लावून बाजू मांडणे जरूरी असल्याचे शिवसेनेला माहीत आहे. परंतु असे करता केवळ भावनिकता जोपासणे कितपत योग्य आहे? याचिकेची खंडपीठात सुनावणी सुरू असताना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी स्थानिक नेते हायकोर्टात गेले. हे नेते स्वत:च न्यायालयास पाडापाडी थांबवा म्हणून सांगतात की काय, असे वाटत होते. परंतु सुदैवाने अशी आपत्ती आेढवली नाही. ऐनवेळी एका वकिलाने सल्ला दिला की, साहेब, असे काही करू नका, नसता अवमान होईल.
 
स्थानिक वकिलांचा सल्लाही धुडकावला
अनेक ज्येष्ठ वकिलांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. अनंत भूषण कानडे यांचाही सल्ला घेतला. खंडपीठातील अॅड. सतीश गोडसे, अॅड. बी. एल. सगरकिल्लारीकर, अॅड. गजानन क्षीरसागर यांच्यासह संपर्कातील इतरही वकील कम शिवसैनिकांना अाजमावून पाहिले. परंतु सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. एका ज्येष्ठ वकिलाने नाव छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, जेव्हा शिवसेनेचे नेते सिंगल शॉकअपच्या लूनावर फिरत होते तेव्हा आम्ही त्यांना न्यायालयीन लढाईत क्षणोक्षणी साथ दिली.
 
बातम्या आणखी आहेत...