आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्यात मतभेद नाहीत : चंद्रकांत खैरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - पैठण शहर शिवसेनेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शिवजागर सप्ताहा’ची रविवारी सांगता झाली. या वेळी भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे त्या दोघांनी आवर्जून सांगितले. मात्र, असे सांगतानाच शाब्दिक चिमटे घेण्याची संधी दोघांनीही गमावली नाही.
या सप्ताहाच्या सांगतेनिमित्त शिवसैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास तीन हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार संदिपान भुमरे आज अनेक दिवसांनंतर प्रथमच एकत्र आले. मेळाव्यात दोघांच्याही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘भुमरे जिंदाबाद’ अशा घोषणा देणाºया कार्यकर्त्यांना ‘बाळासाहेबांच्याच घोषणा द्या’ असा सज्जड दम खैरेंनी भरला. त्याच वेळी वातावरण तापायला सुरुवात झाली. त्यामुळे ते दोघे काय बोलतात याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भुमरे म्हणाले, शिवसेनेमुळेच मी मोठा झालो. मी कधीही पक्ष सोडणार नाही. मात्र, पक्षात काही बांडगुळे आहेत, त्यांच्यामुळे गैरसमज निर्माण झाले.
माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. खैरे आणि माझ्यामध्ये काही तात्त्विक मतभेद होते, पण आता ते दूर झाले आहेत. इथून पुढे आम्ही पक्ष वाढवण्यासाठी एकत्र येणार आहोत. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी, असा टोला भुमरे यांनी खैरेंचे नाव न घेता लगावला.
खासदार खैरे म्हणाले, शिवसेनेचा पिंडच मुळात संघर्षाचा आहे. तिची ओळखही संघर्ष करणारी संघटना अशीच आहे. मात्र, काही कार्यकर्ते लाभाची पदे मिळाली की, संघर्ष करणे विसरतात. पूर्वी केलेल्या चुका न सुधारल्याने आणि मेहनत कमी पडल्यामुळे भुमरेंना चौथ्यांदा आमदारकी मिळाली नाही. या वेळी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, तालुकाप्रमुख विजय जाधव, पुष्पा गव्हाणे, सभापती विलास भुमरे, डॉ. पंडित किल्लारीकर, प्रल्हाद औटे, अरुण काळे आदींची उपस्थिती होती.