आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनवाणी पर्वामुळे सेनेत संशयकल्लोळ,खैरे, दानवे, जैस्वालांचे निकटवर्तीय रडारवर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेला लढत देण्यासाठी भाजपमधील जुन्या जाणत्या निष्ठावानांच्या नाकावर टिच्चून शहराध्यध्यपदी किशनचंद तनवाणी यांची वर्णी लावली गेली. सेनेला खिंडार पाडण्याची रणनीती तनवाणी यांनी आधीच निश्चित केल्याने आता सेनेतून भाजपमध्ये कोण जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खासदार चंद्रकांत खैरे, माजी आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट यांचे निकटवर्तीयच तनवाणी यांच्या रडारवर असल्याची चर्चा असल्याने शिवसेनेत संशयकल्लोळ माजला आहे.
आतापर्यंत खैरे, जैस्वाल, शिरसाट यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी डावललेल्या कार्यकर्त्यांना तनवाणी यांनी जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केल्याने आपल्याला सोडून कोण जाणार याची चर्चा शिवसैनिकांत सुरू झाली आहे. भाजपमध्ये कोण जाणार यावर आता पैजाही लागत असल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे आपला कार्यकर्ता आपल्याला सोडून जाणार नाही यासाठी या नेत्यांना कसरत करावी लागत आहे.

शहराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनच त्यांनी अनेकांशी संपर्क केल्याने सेनेतील मातब्बरांचे धाबे दणाणले आहेत. शिवसेनेत आजी-माजी आमदारांचे निष्ठावान अशी ओळख असलेल्यांना तनवाणी यांनी लक्ष्य केल्याचे समजते. विशेष म्हणजे ही बाब खैरे, जैस्वाल, शिरसाट, दानवे यांच्या कानी गेल्याने आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे तसेच समजावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे सांगण्यात येते. महत्त्वाचे पदाधिकारी, विद्यमान नगरसेवकही भाजपच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते. नगरसेवक तूर्तास भाजपमध्ये जाणार नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

बडेमासे गळाला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्या तसेच स्थानिक नेत्यांच्या अवहेलनेचे बळी ठरलेल्यांची यादीच तनवाणी यांच्याकडे आहे. येत्या काही दिवसांत ही मंडळी भाजपवासी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेप्रमाणेच भाजपही हिंदुत्ववादी पक्ष आहे, असे जाहीरपणे ठसवण्यात येत आहे.

निष्ठावानांवर संशय
कार्यकर्त्यांवर ज्येष्ठांकडून संशय घेतला जात आहे. ‘तू भाजपमध्ये जाण्याचे ठरवले का?’ अशी विचारणा होत असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यावर वरिष्ठाने संशय घ्यावा, अशी तनवाणी यांचीही इच्छा असल्याने त्यांनीही या दिशेने पेरणी सुरू केल्याचे समजते.

वरकडांचे सेनेत अनपेक्षित इनकमिंग
दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू वरकड यांनी बुधवारी अनपेक्षितपणे शिवसेनेत प्रवेश केला. खुलताबाद तालुका उपाध्यक्ष असलेले वरकड हे नुकतेच जिल्हा उपाध्यक्ष झाले होते. परंतु ते शिवसेनेत गेले. सध्या सर्वत्र भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सिलसिला सुरू असताना वरकड यांनी सेनेत प्रवेश केल्याने याचा आनंद सेनेच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला.