आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीची अपेक्षा ठेवता सेना-भाजपची स्वबळाची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, असे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी स्पष्ट केले तर दुसरीकडे शिवसेनेनेही योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच, असे गृहीत धरून स्थानिक पातळीवरील दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची तयारी चालवली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार दोन्हीही पक्षाकडून निश्चित झाले असल्याचे समजते.
जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद पैठण या पाच नगर परिषदांसाठी आचारसंहिता जारी झाली. या वेळी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळेच युती होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार मराठवाड्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार आहे. याचा धसका भाजपने घेतला असून काय करायचे ते करा, युती करायची की नाही ते स्थानिक पातळीवर ठरवा, परंतु जास्तीत जास्त नगराध्यक्ष पक्षाचे निवडून आलेच पाहिजे, असा आदेशच भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. इकडे शिवसेनेनेही जोरदार तयारी चालवली असून भाजप नेत्यांची वारंवार येणारी वक्तव्ये लक्षात घेऊन स्वबळाची तयारी केली आहे. पाचही ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सेनेने तयार ठेवले आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणी युती झाली तर ठीक, अन्यथा आम्ही सज्ज आहोत, असे दोन्हीही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैजापूर नगर परिषदेचा विचार करता येथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. सेनेचा आमदार असतानाही नगर परिषद ही काँग्रेस आघाडीच्या ताब्यात राहिली. युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेकडे असल्याने येथे भाजप जास्त वाढली नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिली. कन्नड येथे शिवसेनेतच फूट आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना उघड आव्हान दिले आहे. येथेही भाजपला फारशी संधी नाही. गंगापुरात भाजप आमदार प्रशांत बंब काय जादू करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खुलताबादमध्येही त्यांना सत्ता मिळवण्याची संधी मिळू शकते. तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. पैठणमध्येही सेना विरुद्ध भाजप असेच चित्र राहू शकते.

स्वबळाची तयारी
^युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे सांगितले आहे. तयारी स्वबळाचीही सुरू आहे. -एकनाथजाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप.

आम्ही सज्ज
^प्रत्येक वॉर्डात उमेदवार देण्याबरोबरच नगराध्यक्षपदाचा तगडा उमेदवार देण्यासाठी आम्ही चाचपणी करतोय. युतीचा निर्णय झाला तर ठीक, अन्यथा आम्ही सज्ज आहोत. -अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
बातम्या आणखी आहेत...