औरंगाबाद - जागा वाटपापासून शिवसेना भाजपमध्ये सुरू झालेली सुंदोपसुंदी आता नव्या टप्प्यावर आली असून महाराष्ट्रदिनी भाजपत दाखल झालेल्या गजानन बारवाल यांना स्थायी समिती सभापतिपद देत शिवसेनेला मिरच्या झोंबायला लावण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. बारवाल यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना भाजपमध्ये जोरदार संघर्ष भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बारवाल यांनी तिकीट नाकारल्याने बंडखोरी केली होती. बारवाल हे शिवसेनेचे संजय बारवाल यांना पराभूत करून निवडूनही आले. निकालानंतर त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी पालकमंत्र्यांपासून सगळ्यांनीच प्रयत्न केले. पण अपमानित झाल्याने
आपण भाजपमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले महाराष्ट्रदिनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेशही केला.
भाजपलामिळाली नवी संधी : मनपानिवडणुकीत शिवसेनेला अडचणीत आणण्याची संधी भाजपने एकदाही सोडली नाही. मग ते जागावाटप असो की बंडखोर्या असोत. नंतर महापौर निवडीच्या निमित्तानेही भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत ताणत शिवसेनेची झोप उडवली होती. आता बारवालांमुळे नवीन संधी भाजपला मिळाली आहे.
पश्चिमवरडोळा : बारवालयांना भाजपत घेत शिवसेनेच्या औरंगाबाद पश्चिम या बालेकिल्ल्यावर भाजपने डोळा ठेवला आहे. बारवालांच्या प्रवेश सोहळ्यात तर त्यांना पश्चिमची उमेदवारी देण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले. एवढेच नाही तर शिवसेनेला मनपात अडचणीत आणायचे असेल शिवसेनेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर बारवाल यांना स्थायी समिती सभापतिपद देण्याची रणनीतीही भाजपने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
सभापतिपद ठरणार भांडणाचे कारण
बारवालयांना सभापतिपद देऊन शिवसेनेच्या नाकाला मिरच्या झोंबतील अशी व्यवस्था भाजप करीत आहे. तसे झाले तर शिवसेनेची कोंडी होणार आहे. यावर शिवसेनेतही अस्वस्थता असून भाजपने फक्त त्यांच्या चिन्हावर निवडून आलेल्यांना उमेदवारी दिली तरच आपण मतदान करू, अशी भूमिका घ्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत दिसून येत आहे. भाजपने अद्याप आपले पत्ते खुले केले नसल्याने शिवसेनेनेही त्यावर जाहीर बोलणे टाळले आहे, पण सभापतिपद हे युतीतील भांडणाचे कारण ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.