आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Chief Uddhav Thackeray Election Rally At Aurangabad

ठाकरेंचा पुन्हा संभाजीनगरचा नारा, अस्मितेचा पत्ताही फेकला रणधुमाळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आमच्यासोबत राहून संभाजीनगर म्हणणारे आता औरंगाबाद म्हणू लागले आहेत; पण एक सांगतो, या शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे आणि विमानतळाला छत्रपती संभाजीराजांचे नाव दिलेच पाहिजे, असे ठणकावत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी भाजपवर शरसंधान करत अस्मितेचा पत्ताही निवडणुकीच्या रणधुमाळीत फेकला.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या नऊ उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेतली. भाजपसोबत युती तुटल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेनंतर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजच्या सभेला गर्दीही प्रचंड होती. त्याची दखल घेत सभेचा प्रारंभच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभांच्या आठवणींनी केला. आपल्या भाषणात त्यांनी भाजप, खासकरून अमित शहा आणि कंपूवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. गेल्‍या आठवड्यात झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख करत त्यांनी पहिला हल्ला चढवला. ते म्हणाले, आमच्यासोबत असताना या शहराला संभाजीनगर म्हणणारे आता औरंगाबाद म्हणू लागले आहेत; पण तुमच्या साक्षीने सांगतो. या शहराला शिवसेनाप्रमुखांनी संभाजीनगर नाव दिले आहे. आजही ठणकावून सांगतो. या शहराला संभाजीनगर नाव दिलेच पाहिजे आणि विमानतळाला संभाजीराजांचे नाव दिलेच पाहिजे. ठाकरे यांनी संभाजीनगर हा अस्मितेचा विषय काढतानाच भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मोदींसाठी घाम गाळला : मोदींचे सरकार यावे म्हणून शिवसेनेनेही घाम गाळला हे विसरू नका, असे ठणकावत ठाकरे म्हणाले की, तिकडे तुमचे काम झाल्याचा आनंद व्यक्त होत असतानाच शिवसेनेला लाथ मारता? देश तुमच्या ताब्यात दिला आहे. महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. गडकरी आणि फडणवीस यांनी वेगळा विदर्भ करण्याची घोषणा केली, त्याचा समाचार घेत ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघाला असाल, तर आम्ही शांत बसणार नाही.
पर्यटनाचे हब करणार
औरंगाबादच्या विकासासाठी व्हिजनमध्ये काय नमूद केले आहे, हे सांगत त्यांनी औरंगाबादला पर्यटन हब करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल, विकासाला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे मराठवाड्याच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट असल्याचे सांगत त्यांनी राज्यात रस्ते विकास केल्याच्या काँग्रेसच्या दाव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, रस्ते केल्याचे जाहीरातीत दाखवता. कशाला थापा मारताय? यांनी काहीच केले नाही. पृथ्वीराज चव्हाण टीव्हीवर बोलताना दिसतात. परीटघडीचे जाकीट घालतात. त्यांच्या काळात राज्य विसकटले, पण यांच्या केसांचा कोंबडा तसाच!
महाराष्ट्र गिळण्यासाठी युती तोडली
भाजप अध्यक्ष अमित शहा, ओम माथूर, फडणवीस यांच्यामुळे युती तुटल्याचा आरोप करत ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भाजपची युती झाली होती; पण महाराष्ट्र गिळायला पाहिजे म्हणून भाजपने युती तोडली. म्हणाले फिफ्टी-फिफ्टी करू. तो काय वाढदिवसाचा केक आहे का? तुमच्या सर्वांच्या हक्काचे काढून मी त्यांना कसे देणार, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. मग भाजप नेते म्हणाले १४५ करा. हे काय आकडे लावताय? मी म्हणालो, तुम्ही देणारे नाही, घेणारे आहात. दिल्लीची मस्ती माझ्याकडे चालणार नाही. मी कोणत्याही शहेनशहासमोर नतमस्तक होणार नाही. मी झुकेन तो माझ्या शिवसैनिकांसमोरच.

औरंगाबादसाठी काय केले?
ठाकरे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जाहिराती सुरू आहेत. हे केले, ते केले. लोकांना उल्लू बनवू नका. नो उल्लू बनाविंग.. गेल्या १५ वर्षांत तुम्हाला औरंगाबादसाठी काही करता आले नाही. उलट भल्यासाठी असणाऱ्या योजनांत खोडा घातला. समांतर जलवाहिनीची योजना कुणी अडवली? हा भगव्याचा बालेकिल्ला आहे म्हणून तुम्ही योजना अडवणार? आता मी करणार औरंगाबादचा विकास.
स्वबळावर पहिली सभा
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर 1989 नंतर शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त सभा व्हायच्या. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनी हे मैदान तुडुंब भरायचे. आता युती तुटल्यानंतर एकट्या शिवसेनेची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेला गर्दी किती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; पण सात वाजेपर्यंत मैदान तुडुंब भरले आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.