आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त धुळीने माखलेली मंदिरे शिवसेनेकडून चकाचक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराच्या खड्डेयुक्त रस्त्यांवरून उडणाऱ्या धुळीने माखलेली ८९हून अधिक मंदिरे आज लख्ख झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित उपक्रमात शहरातील सुमारे ८९ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने हिंदू जनजागरण पंधरवड्याचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ८९ मंदिरे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला. या मोहिमेत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, नगरसेवक सुशील खेडकर, सुनीता सोनवणे, उपजिल्हाप्रमुख जयवंत बंडू ओक, माजी नगरसेवक सतीश कटकटे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.

अंबादास दानवे यांनी या मोहिमेत सहभागी होत कोटला कॉलनीतील श्रीशनी मंदिर, श्रीनिकेतन कॉलनीतील काशीविश्वेश्वर मंदिर, रोकडा हनुमान कॉलनीतील बालाजी मंदिर, गारखेड्यातील हनुमान मंदिराचा परिसर स्वच्छ केला. प्रदीप जैस्वाल यांनी नागेश्वर वाडीतील महालक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर, हर्सूलचे हरसिद्धीमाता मंदिर येथे स्वच्छता अभियानात सहभाग घेतला तर राजू वैद्य यांनी पन्नालालनगरातील गणेश मंदिर संतोष जेजूरकर यांनी कैलासनगरातील स्मशान मारुती मंदिरात हे अभियान राबवले. स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे कोकणवाडीतील गणपती मंदिराचा परिसर चकाचक केला.

नागरिकांचाही सहभाग
शहरातीलमंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नागरिकांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रविवारचा दिवस असल्याने रोकडा हनुमान कॉलनीतील बालाजी मंदिर, कोटला कॉलनीत अनेक नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला या मोहिमेत सभागी झाल्या. विशेष म्हणजे स्वच्छता करण्यासाठी झाडू, डस्टबीन इत्यादी साहित्य त्यांनी सोबतच आणले होते. मंदिराचा परिसर रविवारी पूर्णपणे स्वच्छ दिसला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुकही केले.

रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे धुळीचे साम्राज्य
यामोहिमेसाठी काही ठिकाणी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या टँकरचा वापर करण्यात आला. बहुतेक मंदिरे आतून बाहेरून धुऊन साफ करण्यात आली. शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम मंदिरे अस्वच्छ होण्यावर झाला आहे. अनेक मंदिरांचे कळस भिंती धुळीच्या सततच्या माऱ्याने काळवंडल्याचे या मोहिमेतून दिसून आले.