आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत यापुढे चालणार भाईगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नेमके कोण, याचे उत्तर सध्या कोणाकडेच नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत वाद नको म्हणून शिवसेनेने सध्या शांत राहण्याचे ठरवले अाहे.
ही निवडणूक होताच जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी बदलले जाणार असून नेमके जिल्हाप्रमुख कोण, याचे उत्तरही तेव्हाच मिळेल, असे संघटनेच्या विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नव्या संघटनेवर जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांचे वर्चस्व असेल, असेही सूत्रांनी नमूद केले आहे.
अंबादास दानवे हे गेल्या ११ वर्षांपासून जिल्हाप्रमुख असून दुसरे जिल्हाप्रमुख म्हणून नरेंद्र त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दानवे हे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढले. तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून सुहास दाशरथे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दाशरथे हे संघटनेचे सहसंपर्कप्रमुख आहेत. माजी आमदार किशनचंद तनवाणी हेही सहसंपर्कप्रमुख होते. मात्र त्यांनी भाजपत प्रवेश केल्याने सहसंपर्कप्रमुखपद रिक्त आहे.
दाशरथे यांचा डोळा जिल्हाप्रमुखपदावर असल्याने सहसंपर्कप्रमुख असतानाही त्यांनी "जिल्हाप्रमुख असेच मला संबोधा' असा हट्ट पदाधिकाऱ्यांकडे धरला आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख नेमके कोण याचा बोध कोणालाही होत नाही.
आमदार संजय शिरसाट यांच्या वतीने गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या जाहिरातीत दानवे यांच्या बरोबरीने दाशरथे यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख असा करण्यात आला होता.
जिल्हाप्रमुख नेमके कोण, याचा शोध ‘दिव्य मराठी’च्या वतीने घेण्यात आला तेव्हा फक्त दीडच महिन्याचा प्रश्न असून एप्रिलनंतर सर्व पदाधिकारी बदलले जातील, असे कळते.
खैरे, जैस्वाल सोडून असतील चेहरे

औरंगाबादेत शिवसेना म्हटले की खासदार चंद्रकांत खैरे व माजी खासदार तथा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांचे नाव घेतले जाते. मात्र यापुढे तसे होणार नाही. शिवसेना म्हणजे जैस्वाल व खैरे नसून ती संघटनेतच आहे हे दाखवले जाईल. त्यामुळे यापुढे संघटनेवर नवे चेहरे दिसतील. जुने चेहरे संघटनेत दिसणार नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून नव्या संघटनेवर आमदार संजय शिरसाट, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांचे वर्चस्व असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.