आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात शिवसेनेने दिले तीन पदांवर नवखे चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी आज शिवसेनेकडून उपमहापौरपदाच्या उमेदवाराबरोबरच गटनेते तसेच सभागृह नेतेपदी नवीन चेहऱ्यांची घोषणा केली. ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उपमहापौरपदाची उमेदवारी स्मिता नितीन घोगरे यांना जाहीर करण्यात आली, तर गटनेतेपदी मकरंद कुलकर्णी, तर सभागृह नेतेपदी गजानन मनगटे यांची नियुक्ती करण्यात आली. घोगरे या शनिवारी उपमहापौरपदाचा अर्ज भरतील, तर अन्य दोघे लवकरच पदभार स्वीकारतील. शिवसेनेने तिन्हीही पदांवर नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. घोगरे, मनगटे आणि कुलकर्णी हे तिघेही पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत.

सेनेच्या वतीने उपमहापौरपदाचा उमेदवार कोण असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अपक्ष म्हणून विजयी झालेल्या, परंतु विजयानंतर शिवसेनेसोबत आलेल्या घोगरे यांना या पदावर संधी देण्यात आली. दुसरीकडे पालिकेतील गट आणि सभागृह नेतेपदावरील चेहरेही बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतले. राजू वैद्य यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी होती, ती मकरंद कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली, तर राजेंद्र जंजाळ हे सभागृह नेते होते, त्यांची जागा आता गजानन मनगटे घेतील. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच व्यक्तीकडे सलग १९ महिने सभागृह नेतेपद राहिले. तिन्ही पदांवर कोणाला संधी द्यावी, यावरून काही दिवस चर्चा सुरू होती.
सेनेच्या जुन्याच धक्कातंत्रानुसार नवख्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय झाला आणि वरील तिन्ही नावे समोर आली. नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त शहरात आलेल्या घोसाळकर यांनी अधिकृत पत्रकार परिषद बोलावून या नावांची घोषणा केली. या वेळी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थित होते. मलाही पक्षाने नवखा असतानाच संधी दिली होती. नव्या तरुणांनाही पालिकेचे कामकाज समजले पाहिजे, असे सांगत मावळते गटनेते राजू वैद्य यांनी या बदलाचे स्वागत केले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पाठीशी आहोतच, असे सांगितले, तर पक्षाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ संधी दिल्याबद्दल मावळते सभागृह नेते जंजाळ यांनीही पक्षाचे आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...