आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leaders Active To Get Back Opposition Leaders In Party

सहा अपक्षांसाठी शिवसेनेचा गळ, मोठा भाऊ होण्यासाठी आमिषाचा खेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेला महापालिकेत निर्विवाद मोठा भाऊ होण्यात आकड्यांचा अडथळा असल्याने तिकडे भाजपचे किशनचंद तनवाणी आमदार अतुल सावे यांनी भाजपच्याच नव्हे, तर शिवसेनेच्याही बंडखोरांना आपल्या तंबूत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याची कल्पना येताच शिवसेनेनेही आपले बंडखोर पुन्हा तंबूत आणण्याची चाल खेळली आहे. त्यात किमान सहा नगरसेवक गळाला लागतील अशी चिन्हे आहेत. चार जणांनी तर "आलोच' अशा शब्दांत तयारी दर्शवली आहे.
आज दुपारी मनपातील संख्याबळाचे चित्र स्पष्ट होऊ लागताच शिवसेना भाजपत जोरदार हालचाली सुरू झाल्या. युतीतील दोन्ही पक्षांच्या संख्याबळात नाममात्र फरक असल्याने मनपात मोठा भाऊ होण्यासाठी जोरदार शर्यत सुरू झाली आहे. भाजपने या जोडतोडीसाठी किशनचंद तनवाणी आमदार अतुल सावे यांच्यावर हा जिम्मा सोपवला आहे, तर खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे ही सारी फौज कामाला लागली आहे.

आमदार शिरसाट यांनी मयूरबन काॅलनीत उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार स्वाती जोशी यांना पराभूत करणाऱ्या स्मिता घोगरे यांना आज दुपारी संपर्क कार्यालयात रामदास कदम यांच्या भेटीला आणून एक जण पक्का केला. शिरसाट यांनीच कांचनवाडी-नक्षत्रवाडीत अनिता घोडेले यांना पराभूत करणाऱ्या विमल जनार्दन कांबळे यांना शिवसेनेकडे खेचण्याची फील्डिंग लावली असून ते जवळपास नक्की झाल्याची बातमी आहे. सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या जगदीश सिद्ध यांना हादरा देत निवडून आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर यशश्री बाखरिया आमदार जैस्वाल यांच्या माध्यमातून सेनेकडे येणार असल्याचे दुपारीच स्पष्ट झाले. विद्यमान सभागृह नेते किशोर नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे या शिवसेनेच्या बंडखोर मयूरनगर वाॅर्डातून विजयी झाल्या. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले नागरे खासदार खैरे यांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत.
शुक्रवारी नागरे पुन्हा अधिकृतरीत्या सेनेच्या तंबूत दाखल होतील. याशिवाय शहराच्या इतर भागांतील काही नगरसेवकांनाही आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्यभामा शिंदे या एन-२ ठाकरेनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. दामुअण्णा शिंदे सत्यभामा शिंदे या निवडणुकीच्या तोंडावर तिकिटाच्या आशेने भाजपमध्ये गेले होते. तेथे त्यांचा पत्ता कटल्याने हे जोडपे भाजपवर नाराज आहे, त्यांना सेनेच्या तंबूत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बारवालांची नाराजी कायमच

विद्यमानमनपातील गटनेते गजानन बारवाल तिकीट नाकाल्याने सेनेवर प्रचंड नाराज आहेत. आज विजयानंतरही त्यांनी आपल्याला शिवसेनेने अपमानास्पद वागणूक दिल्याने आपण सेनेसोबत नाही, तर भाजपमध्ये जाऊ, असे सांगितल्याने त्यांच्यावर डोळे लावून बसलेले शिवसेनेचे नेते हादरले.
पालकमंत्री रामदास कदम यांनी बारवाल यांना भेटण्याची तयारी चालवली आहे. खासदार खैरेही यात उतरले आहेत, तर आमदार शिरसाटही आपली सूत्रे वापरत आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार घोडेले यांच्यावर बारवाल यांना तत्काळ घेऊन येण्याची भेट घडवण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. घोडेले बारवाल नातेवाईक असल्याने कदम यांनी घोडेले यांना मैदानात उतरवले आहे.