आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leaders Panic In Aurangabad City After MOdi Rally

औरंगाबादमधील मोदींच्या विराट सभेमुळे शिवसेनेच्या तंबूत आता ‘डरडर मोदी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विराट जाहीर सभेनंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मोदींच्या सभेला झालेली गर्दी मतांमध्ये परावर्तित झाली तर औरंगाबाद मध्य व पश्चिम या दोन मतदारसंघांत अत्यंत कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यात भर म्हणून आज मोदींच्या सभेत किशनचंद तनवाणी समर्थक तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश करून शिवसेनेला आणखी एक हादरा दिला. येणाऱ्या काळात आणखी मोठे भगदाड पाडण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याची चर्चा आहे.

औरंगाबादच्या राजकीय सभांच्या इतिहासात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचा रेकाॅर्ड कोणालाही मोडता आलेला नाही. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान काठोकाठ भरणारा एकही नेता आतापर्यंत न झाल्याने ठाकरे यांच्या सभा या गर्दीचा मानदंड मानल्या जातात. हा रेकॉर्ड शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी मोडला. आतापर्यंत ठाकरे यांच्या सभांना एक लाखापर्यंत लोकांची उपस्थिती असे. आज मात्र गरवारे स्टेडियमवर झालेल्या या सभेला दीड लाखाच्या आसपास गर्दी झाल्याचा पोलिसांचाच अंदाज आहे. या गर्दीने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असले तरी शिवसेनेत मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गरवारे स्टेडियमवर नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले आणि इकडे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयांत टीव्हीसमोर शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले. आतापर्यंत हिंदुत्ववादी म्हणून समजली जाणारी व्होट बँक मोदींच्या या तडाख्यामुळे फुटून भाजपकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोदी यांच्या सभेच्या आधी शिवसेनेला खिंडार पडणार अशी चिन्हे होती.‘दिव्य मराठी’ने तीन दिवसांपूर्वीच ते वृत्त दिले होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र तिवारी यांची खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी विचार बदलला. मात्र, शिवसेनेतून भाजपमध्ये जात मध्यची उमेदवारी मिळवलेल्या माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही शिवसेनेशी काडीमोड घेतला. प्रीती तोतला, जगदीश सिद्ध आणि सुरेंद्र कुलकर्णी या तीन नगरसेवकांनी आज सभेदरम्यान भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला. सिद्ध आणि तोतला यांच्या जाण्याने या मतदारसंघातील शिवसेनेच्या ताब्यातील १३ पैकी दोन वॉर्ड भाजपकडे गेले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेतून आणखी बरेच जण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

शिवछत्रपतींचा पुतळा भेट
शिवछत्रपतींचा उल्लेख करत भाजपने राज्यात जोरदार प्रचार मोहीम उघडली आहे. त्याचाच धागा पकडत शहरप्रमुख भगवान घडामोडे आणि प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी मोदी यांना या वेळी शिवछत्रपतींचा छोटा पुतळा भेट स्वरूपात दिला.