आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभव : पालिकेच्या इतिहासात प्रथमच गुलमंडीवर सेना नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीवर धनुष्यबाणाला पराभूत व्हावे लागले. दोघांनी बंडखोरी केल्याने सर्वांचेच लक्ष लागलेल्या या वाॅर्डातून भाजप बंडखोर तथा माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी विजयी झाले.
सेना बंडखोर राजेश ऊर्फ पप्पू व्यास हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेचे उमेदवार तथा खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. युतीने लढत असतानाही गुलमंडीवर झालेला पराभव सेनेच्या जिव्हारी लागला. त्यानंतर तनवाणी यांचे कार्यालय व्यास यांच्या घरावर दगडफेक झाली. त्यामुळे येथे दुपारी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खैरे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि तनवाणी बंधूंचा कायम संपर्क यामुळे गुलमंडी शिवसेना म्हणजेच खैरेंच्या ताब्यातून घेण्यात तनवाणी यांना यश आले, अशी चर्चा गुलमंडीवर होती. हा शिवसेनेचा नव्हे तर खासदार खैरे यांचा पराभव असल्याचे काही सैनिकांचे म्हणणे आहे. तनवाणींचे गुलमंडीवरील वर्चस्वही यानिमित्ताने अधोरेखित झाले.

खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी असे नगरसेवक देणाऱ्या या वाॅर्डात शिवसेनेचाच दबदबा कायम राहिला आहे. याच वाॅर्डातून निवडून आलेले नंतर राजकारणात पुढे जातात, असेही शिवसेनेत बोलले जाते. पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने पप्पू व्यास यांनी रिंगणात उडी घेतली, तर खैरे कुटुंबातील कोणी लढत असेल तर तनवाणी कुटुंबातील एक जण लढेलच म्हणत राजू तनवाणीही मैदानात उतरले. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच किशनचंद तनवाणी हे सध्या भाजपमध्ये असल्यामुळे भावाला मदत करण्याचा त्यांच्यावर दबाव होता. मात्र, व्यास यांच्याबरोबरच तनवाणी यांनी जोमाने प्रचार चालवला होता. याचा अंदाज आल्याने शेवटच्या तीन दिवसांत खैरे यांनी या वाॅर्डात शक्ती पणाला लावली.
मात्र बुधवारी मतदान संपल्यानंतरच गुलमंडीवर एक विचित्र सन्नाटा पसरला होता. तेव्हाच गुलमंडी हातातून गेली, असे संकेत शिवसैनिकांना मिळत होते.सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच फेरीत तनवाणी पहिल्या क्रमांकावर, व्यास दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आणि शेवटपर्यंत हा ट्रेंड कायम राहिला आणि गुलमंडीवर प्रथम शिवसेनेशिवाय दुसरा उमेदवार विजयी झाला. असे असले तरी राजू तनवाणी हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने शेवटी शिवसैनिकच येथील नगरसेवक आहे, असे काही जण म्हणू शकतील.

गुलमंडीवर पक्षाची नव्हे, हिंदुत्वाची मक्तेदारी
गुलमंडी हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. कोण्या एका पक्षाचा नाही. त्यामुळे येथून हिंदुत्वाचाच विजय झाला आहे. येथे हिंदुत्वाचे वर्चस्व कायम राहील, अशी प्रतिक्रिया राजू तनवाणी यांनी विजयानंतर दिली. हा सर्व कार्यकर्त्यांचा तसेच तनवाणींचा विजय आहे, यापुढे आपण विकासासाठी युतीबरोबरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पप्पू व्यास यांनी २०१० मध्येही बंडखोरी केली होती. तरीही त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले. या वेळी वाॅर्ड ओपन झाल्याने त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. मात्र, उमेदवारी मिळाल्याने त्यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा पदरी अपयशच आले. विशेष म्हणजे गतवेळीही ते २०० मतांनी पराभूत झाले होते. या वेळीही पराभवाचे अंतर १५८ एवढेच राहिले.

वादाचा भडका

गुलमंडी हातातून गेल्यानंतर शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. काहींनी तनवाणी यांच्या जेथलिया टॉवर येथील कार्यालयावर दगडफेक केली, तर व्यास यांच्या घरावरही दगड पडले. यात एका महिलेला लागल्याची अफवा पसरल्याने येथे तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेऊन प्रकरणावर ताबा मिळवला. सायंकाळी येथील व्यवहार सुरळीत झाले होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (डेमाेक्रॅटिक) इंदिरानगर, बायजीपुरा येथील विद्यमान नगरसेवक कैलास गायकवाड यांनी भारतनगर येथून बाजी मारली. इंदिरानगर येथून ओबीसी प्रवर्गाचे रमेश जायभाये यांनाही रिपाइंच्या उमेदवारीवर निवडून आणले. न्यायनगर येथील विद्यमान नगरसेविका पुष्पा निरपगारे यांचा पराभव झाला. प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी त्यामुळेच स्वाभिमान आणि इंदिरानगरचा गडही जपला आहे.

रिपाइं (ए) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उमेदवारांनी सेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवली. त्यामध्ये नंदनवन कॉलनी येथील चारुलता सुनील मगरे, क्रांतीनगर येथून मंगल प्रकाश गायकवाड, एकनाथनगर येथून शोभा बालाजी सूर्यवंशी, लक्ष्मी कॉलनी, गरमपाणी वॉर्डातून पाखरे यांचा पराभव झाला. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पीआरपीचे काही उमेदवार उभे केले होते, मात्र अनेकांची अनामत रक्कम जप्त झाली.

बसपाला मतदारांची पसंती

आरतीनगर,मिसारवाडी येथून बसपाच्या पूजा जाधव यांचा ३८ मतांनी पराभव झाला. संगीता वाघुले यांनी त्यांना पराभूत केले. अनेक वॉर्डांत दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते बसपाने घेतली आहेत. भीमनगर (उत्तर) येथून ओबीसी प्रवर्गाच्या डॉ. अर्चना गणवीर यांनी ६०० मते घेतली, तर दक्षिण येथून मीना वाघ यांनी ४७० मते घेतली आहेत. ज्ञानेश्वर कॉलनी येथे संजय शिंदे यांनी ७३५ मते घेतली आहेत.