आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला; सर्वच नेत्यांची औरंगाबादेत कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोणत्याही प्रश्नावर पेटून उठणार्‍या शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या घोषवाक्याचा हिंदूंनाच विसर पडत आहे, अशी खंत व्यक्त करीत हा आक्रमकपणा पुन्हा आणा, अशी हाक शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. इतर पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गटनेत्यांच्या मेळाव्यात आज (9 जून) आक्रमकतेवर एकमुखी भूमिका घेण्यात आल्याचे चित्र दिसले. शिवसेना पुन्हा उभारी घेत आहे, असे उद्गारही काहींनी काढले.

कोणत्याही इमारतीचे भवितव्य त्या इमारतीचा पाया किती मजबूत आहे यावर अवलंबून असते. तळागाळातील शिवसैनिक हे पक्षाचे कवच आहे. ते पक्षासाठी जिवाचे रान करतात. त्यांचा कधीही विसर पडू देऊ नका, असे बाळासाहेबांनी सांगितले आहे. त्याचे पालन सर्व पदाधिकार्‍यांनी करावे, असे आवाहन देसाई यांनी या वेळी केले. काँग्रेसमध्ये जिवंतपणाच शिल्लक नसल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळेच सीमारेषेवर भारतीय सैनिकांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद हा 28 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो जिंकणे कोणालाही शक्य नाही. त्यासाठी शिवसैनिकांना जपा, असे आवाहनही त्यांनी केले. कामाला लागा. बोगस मतदारांची नावे काढून फेका. नवीन मतदारांची नावे यादीत समाविष्ट करा, असे सांगत त्यांनी निवडणुकीची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. ओवेसी आज पोस्टर लावतोय, उद्या तो सर्वत्र हिरवे झेंडे लावेल. त्याआधी त्याकडे लक्ष द्या, असेही देसाई म्हणाले.

कोण काय म्हणाले

बाळासाहेब नेहमी कार्यकर्त्यांना म्हणायचे, ‘तुम्हाला ईश्वराने दिलेले दोन हात देण्यासाठी आहेत. ते तुम्ही ओरबाडण्यासाठी वापरत असाल तर त्याची फळेही भोगावी लागतील.’ त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर समाजसेवक म्हणून वागा. अँड. लीलाधर डाके, शिवसेना नेते

जिल्ह्यात शिवसेनेचा दरारा कायम राहील. महिला गटप्रमुखांची नेमणूक केली जाईल. सलमान, अझरुद्दीन आला तरी मी पडणार नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेत आमच्या चुका झाल्या हे मान्य करतो. ओवेसी पुन्हा आला तर शेरवानी फाडू. शिवसैनिकांनी आक्रमकता विसरू नये. चंद्रकांत खैरे, खासदार

गटातटाच्या राजकारणामुळे तीन आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती शिवसेनेला गमवाव्या लागल्या. त्यामुळे आगामी 2014 च्या निवडणुकीत कुणी गटातटाचे राजकारण करू नये. गटप्रमुख सक्षम असेल तर कोणत्याही अडचणी येणार नाहीत. विनोद घोसाळकर, आमदार, संपर्कप्रमुख, औरंगाबाद

4हसरूल सावंगी येथे दहशतवादी राहत होते. रोजाबाग गोळीबार हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे आपसातील सर्व मतभेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्र यावे. आधी एखाद्या शिवसैनिकाला थापड मारली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जायचे. आज ही एकता दिसून येत नाही. ती पुन्हा निर्माण करावी. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख

शिवसेना उभी करा

शिवसेना नसती तर मी आज रिक्षाचालक राहिलो असतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या इच्छेतील शिवसेना उभी करण्यासाठी सर्वांनी पुढे या. संजय शिरसाट, आमदार

हैदराबादवरून एक आमदार औरंगाबादेत येऊन हिंदूंची कत्तल करण्यासाठी केवळ 15 मिनिटे मागतो. त्याविरोधात कुणी आवाज करत नाही. शिवसैनिकांनी पुन्हा एकदा विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सुधारणा झाली नाही तर निझामापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल. प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, आमदार