आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Played Checkmate Game In Aurangabad Election

दुटप्पी भूमिका : बंडखोरांच्या आडून युतीचे चेकमेट सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत बंडखोरांचा वापर सोयीप्रमाणे करीत एकमेकांना बंडखोरांना चेकमेट देण्याचे प्रकार शिवसेना भाजपने सुरूच ठेवले आहेत. उद्धव ठाकरे यांनी २८ मिनिटांच्या जाहीर सभेत मिनिटे बंडखोरांना सुनावल्यानंतर २४ बंडखोरांची त्यांच्याशी संबंधित २० पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. गंमत म्हणजे हे सारे बंडखोर शिवसेनेच्या उमेदवाराविरोधातच उभे आहेत.
दुसरीकडे भाजपने शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवत फक्त आपल्याच उमेदवारांविरुद्ध बंड करणाऱ्या आठ जणांना पक्षातून हाकलले. गुलमंडी, बाळकृष्णनगर या सेनेच्या बड्या वॉर्डांसह इतर ठिकाणी बंडखोर झेंडे फडकावतच आहेत. यावरूनच बंडखोरांवर कारवाई करण्यात दोन्ही पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याचेच दिसून येत आहे.

आपल्या लेकराबाळांचे, अतिशय जवळच्यांचे वॉर्ड सुरक्षित निघावेत यासाठी दोन्ही पक्षांचे नेते बंडखोरांना चुचकारत होते. बंडखोरांवर कारवाई होणार, असे नुसतेच जाहीर करण्यात आले. काल तर जाहीर सभेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांना तत्काळ पक्षातून काढणार असल्याची घोषणा केली, तर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना निर्वाणीचे वगैरे इशारे दिले. मात्र, बंडखोर असला तरी तो आपलाच आहे आणि त्याची बंडखोरी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध असेल तर आपण त्याची कशाला काळजी करायची, असा खास पवित्रा सेना नेत्यांनी घेतला. निकालानंतर यातील काही जण आपल्यासोबत येतीलच, असाही ठोकताळा त्यामागे आहे. तो पाहून भाजपने त्याचेच अनुकरण केले. शिवसेनेच्या विरोधातील बंडखोरांकडे दुर्लक्ष केलेच, शिवाय त्यांना मोठी रसदही पोहोचवली आहे.
प्रचाराचे वैशिष्ट्य

- अनेक वॉर्डांत बाहेरचा की स्थानिक हाच मुद्दा राहिला
- एमआयएमचा बागुलबुवा दाखवत शिवसेना भाजपने प्रचार केला.
- काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांची व्होट बँक पळवणाऱ्या एमआयएमलाच टार्गेट केले.
- एमआयएम, हिंदुत्व याभोवतीच प्रचार फिरल्याने विकासाला प्राधान्य मिळाले नाही.
- अनेक बंडखोरांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने चक्क पुरस्कृत असाही प्रचार केला.

प्रचार थंडावला

दरम्यान,सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पक्षाचे उमेदवार बंडखोरांनी ताकद पणाला लावत प्रत्येक वॉर्ड दणाणून टाकला. ढोल-ताशे, डीजेच्या दणदणाटात प्रचारफेऱ्या, भोंगे अशी सारी शक्ती पणाला लावत सर्वच उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली.

सेनेच्या वॉर्डात आहेतच

शिवसेनेने केवळ सेनेच्या विरोधात बंड केलेल्यांची हकालपट्टी केल्याचे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर दुपारी भाजप नेत्यांची बैठक झाली. त्यात भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात बंड केलेल्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुलमंडीवर बंडखोरी करणारे राजू तनवाणी, महापौरांच्या विरोधात बंडखोरी करणारे उमाकांत रत्नपारखी यांसह शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश नाही.

यांची हकालपट्टी

सेनेने स्वाती नागरे, वंदना सेठी, ज्ञानोबा जाधव, साहेबराव महापुरे, मनीषा कांबळे, शारदा पद्मणे, बाबासाहेब गदाई, मंगेश भाले, पप्पू व्यास, विमल राजपूत, कृष्णा मंगरूळकर, गजानन बारवाल, भरत बरथुने, जगन्नाथ कोऱ्हाळे, पुखराज काळे, जगन्नाथ उगले, अवधूत अंधारे, कमल चक्रे, लक्ष्मी लुटे, विजय वाघमारे, अंबादास हिवाळे, विनोद सोनवणे, प्रवीण जाधव, लक्ष्मण सोनवणे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली. शिवाय त्यांच्याशी संबंधित २० पदाधिकाऱ्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. आहे. त्यात शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे सुनीता बरथुने यांचा समावेश आहे.

भाजपच्या वॉर्डातील बंडखोरांना अभय

ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेने २४ बंडखोर उमेदवार त्यांच्याशी संबंधित २० पदाधिकारी यांना पक्षातून काढल्याचे जाहीर केले. मात्र, भाजपच्या उमेदवाराविरोधातील शिवसेनेच्या बऱ्याच बंडखोरांवर कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई झालेल्यांत सुशील खेडकर यांचा समावेश आहे.

बंडखोरांना पक्षाबाहेर तत्काळ काढण्याची घोषणा करून जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाळ्या वसूल केल्या असल्या तरी प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी भाजपला सोमवारची रात्र उजाडावी लागली. त्यांनी फक्त आठ बंडखोरांना पक्षातून काढून टाकले. भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, गुरुनाथ कुलकर्णी, आमदार अतुल सावे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली. मधुकर सावंत, सतीश जाधव, सचिन मिसाळ, नामदेव बेंद्रे, मीरा अनिल लहाने, सत्यभामा शिंदे, विद्या पुंगळे, गणेश इधाते हे ते आठ बंडखोर आहेत.