आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिज्ञेपेक्षा वाघासारखी डरकाळी फोडा; जुन्या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्षासोबत राहण्याची प्रतिज्ञा देण्यापेक्षा वाघासारखी डरकाळी फोडावी, तर ते अधिक परिणामकारक होईल, अशी अपेक्षा औरंगाबादेतील जुन्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (23 जानेवारी) मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी, नेत्यांना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली. त्याबद्दल स्थानिक शिवसैनिकांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. तेव्हा त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांची मते व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आंदोलने हा शिवसेनेचा आत्मा आहे. मोठे साहेब नेहमी शिवसैनिकांना कोणत्या ना कोणत्या आंदोलनात गुंतवून ठेवायचे किंवा सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी भाग पाडायचे. त्यांच्या निधनानंतर आंदोलनांची जागा बैठका, चर्चासत्रांनी घेतली आहे. सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी भरवेल असे राज्यपातळीवर आंदोलनही झाले नाही. त्यातच पंधरा वर्षांपासून सत्ता हुलकावणी देत आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. ते स्थलांतराच्या प्रयत्नात आहेत. त्यांना रोखून धरण्यासाठी हा शिवबंधन कार्यक्रम आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण ज्यांना सत्तेचा मोह आहे. ते अशा बंधनांना मानणार नाहीत. त्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या शैलीत वाघासारखी डरकाळी फोडावी.
आक्रमक आंदोलन राज्यभरात हाती घ्यावे. तर किमान अशा नेत्यांवर जरब बसेल, असेही मत शिवसैनिकांनी व्यक्त केले.
नेत्यांवरही दबाव येतो
शिवबंधन कार्यक्रमात सहभागी झालेले माजी नगरसेवक सतीश कटकटे यांनी मात्र हा उपक्रम अतिशय चांगला होता, असे सांगितले. शिवसैनिक कायम रस्त्यावर असतो आणि स्थानिक पातळीवर कायम आंदोलन करतच असतो. त्याला पक्षासोबत बांधून ठेवण्यासाठी धागा बांधण्यात गैर काहीच नाही, असे सांगितले. शिवसैनिक रवी कदम म्हणाले की, अशा उपक्रमातून आपुलकीचे नाते तयार होते. नेत्यांवरही दबाव येतो. पक्ष सोडून जाण्याचा विचार त्यांच्या मनातून निघून जातो.