वाळूज- सिडको प्रशासनाने १८ पैकी गावे सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातून नुकतीच वगळली. या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी रांजणगाव येथील आयोजित कार्यक्रम उधळून लावला. मोठ्या संख्येत आलेल्या शिवसैनिकांना पाहून आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी असणाऱ्या खुर्च्यांची तोडफोड करत नुकसान केले.
गेल्या दोन दिवसांपासून रांजणगाव येथील स्थानिक भाजप पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत बंब शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने पाठपुरावा केल्यामुळेच सदरील गावे अधिसूचित क्षेत्रातून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांच्या सत्काराची जय्यत तयारी करण्यात आली होती.
याबाबत वर्तमानपत्र होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी करण्यात आली होती, तर दुसरीकडे सिडको प्रशासनाला वेळोवेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना रांजणगाव पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट तसेच वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पत्रक देऊन करण्यात आला होता. गावात आलेल्या आमदार बंब यांना शेकडोच्या संख्येत आलेल्या शिवसेनेच्या घोळक्याने घेराव घातला. आमदार बंब यांनी सत्कार समारंभ रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र, पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला.
शिवसेनेने आजघातलेला गोंधळ लोकशाहीसाठी घातक आहे. खा. चंद्रकांत खैरे यांनी स्वत:ची कामे जाहीर करून कार्यक्रम घ्यावेत. त्यास आमचा विरोध नाही. आम्ही संयम बाळगला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
-प्रशांत बंब, आमदार
घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत धाव घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की, दुःखद घटनेमध्ये मृत पावलेल्या भावंडांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेण्यात येत होता. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तो उधळून लावत खुर्च्यांची तोडफोड केली.