आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदत स्वीकारताना शर्मिंदगी, पण नियतीपुढे इलाज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या वतीने आयोजित मदत वाटप कार्यक्रमास उपस्थित शेतकरी. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
शिवसेनेच्या वतीने आयोजित मदत वाटप कार्यक्रमास उपस्थित शेतकरी. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद- आम्हीच सर्व काही पिकवतो, पण आज आमच्याकडे कवडीही राहिली नाही. शिवसेनेकडून मिळणारी ही मदत स्वीकारताना मनात शर्मिंदगी आहे, पण नियतीने दुसरा इलाज ठेवला नाही, अशाच काहीशा भावना शिवसेनेकडून मदत स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांच्या होत्या. शिवसेनेच्या वतीने खुलताबाद येथे एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार, तर फुंलब्री येथे तेवढ्याच शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मदत स्वीकारल्यानंतर यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ही मंडळी अस्वस्थ तर आहेच, पण तरीही काही मदत मिळत असल्याने आशावादी दिसली. भीषण परिस्थितीतही त्यांचा स्वाभिमान डगमगला नाही. त्यामुळेच फुलंब्री येथे जीवनावश्यक वस्तूंचे पोते हाती पडल्यानंतर वृद्ध वत्सलाबाई म्हस्के यांना शर्मिंदगीची जाणीव होते. साडेचार एकर शेती असलेल्या वत्सलाबाई यांना चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके बसत आहेत. परंतु अजूनही त्यांनी हार मानलेली नाही. यंदा जशी पावसाळ्याची सुरुवात झाली होती तसाच पाऊस पुढे सुरू राहिला असता तर चित्र वेगळे असते, असे त्या म्हणाल्या.

चार वर्षांच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावत असल्याची चर्चा आहे. परंतु शेतकरी अजूनही संकटाशी सामना करून त्यापुढे जाण्याचा विचार करतो, हे समोर आले. पिकवून इतरांना देणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांकडे आता कवडीही शिल्लक राहिली नाही. तरीही मदत स्वीकारावी की नाही, यावर विचार करत होतो. ही मदत आयुष्याला पुरणारी नाही, पण वेळच अशी आहे की ती नाकारून चालणार नाही. सध्याचे भागले, पुढचे बघू. संकट झेलणारा मी एकटा थोडाच आहे, असा आत्मविश्वासक सवाल हरिभाऊ ढगे यांनी केला. आत्महत्या केल्यानंतर सरकार मदत करते. पण जिवंतपणी कोणी आजपर्यंत मदतीला आले नव्हते. या वेळी असे घडले. त्यामुळे ही मदत घेताना काहीसे बरे वाटल्याचेही ते म्हणाले.

शेतात जे जास्त पिकते त्याचा वानोळा देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात आहे. मात्र, वानोळा देण्याची परिस्थिती तेवढी आज राहिली नाही. आमच्याकडे नाही, पण अन्य कोणा शेतकऱ्याच्या शेतात जे पिकले ते अडचणीच्या वेळी आम्हाला मिळाले. याला मी वानोळा समजून घेतो. जेव्हा माझ्या शेतात पिकेल तेव्हा नक्कीच तो परत करेन, असा विश्वासू सूर यशवंत गाडेकर यांचा आहे.