आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांसाठी शिवसेना स्थापणार उभारी पथके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे दुष्काळाच्या बाबतीत काय उपाययोजना करण्यात याव्यात याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिली जात असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी उभारी पथक नेमण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम या उभारी पथकांच्या माध्यमातून केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून मार्गदर्शन करता यावे यासाठी शिवसैनिकांना प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते फुलंब्रीत दुष्काळग्रस्तांना मदत वाटप कार्यक्रमात बोलत होते.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना आता थेट गावागावात जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेनेच्या वतीने पथकाची निर्मितीदेखील करण्यात येणार आहे.

योजनांच्यालाभासाठी उभारी पथकांचे सहकार्य
यावेळी ठाकरे म्हणाले की, ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे कोणत्या योजनांचा फायदा घ्यावा याची माहिती त्यांना नसते. म्हणून शेतकऱ्यांना योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी उभारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या शाखेमधून शिवसैनिकांची निवड केली जाणार आहे. या शिवसैनिकांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उभारी पथकातील शिवसैनिक ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कोणती योजना आहे, त्याचा फायदा तु्म्हाला कसा मिळणार, याबाबत मार्गर्दशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौरा करून घोषणांचा पाऊस पाडला. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत कोणतीच मदत पोहोचली नाही. मग अशा घोषणांचा काय फायदा? सत्तेच्या सहभागाचा फायदा शेतकऱ्यांना करून दिला नाही तर ते लज्जास्पद ठरेल. हॉटेल विंडसर कॅसल येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही टोलेबाजी केली. सरकार काय करेल, विरोधक काय बोलतील ते मला माहिती नाही; परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी जनतेला अभिमान वाटावा असे काम करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे, दीपक केसरकर,अनिल राठोड, खासदार चंद्रकांत खैरे, रवींद्र गायकवाड, बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकदाजेलमध्ये जा : माजीकृषिमंत्री शरद पवार यांनीही दुष्काळी स्थिती पाहण्यासाठी दौरा केला. त्यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस १४ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करणार आहे. त्यांनी खुशाल आंदोलन करून जेलमध्ये जावे अन् जेलमध्ये सगळे काही बघून बाहेर यावे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

संघाला टक्कर
राष्ट्रीयस्वयंसेवक संघाच्या वतीने दुष्काळात कामे करण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यासाठी मंत्रीही हजर होते. दुष्काळात संघाचे स्वयंसेवकदेखील कामे करत आहेत. त्यामुळे या उभारी पथकांच्या माध्यमातून शिवसेना ग्रामीण स्तरावरही सक्रिय होणार आहे. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शिवसेनेच्या शाखेतून शिवसैनिकांना कामाला लावण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे संघाच्या कामाला या माध्यमातून टक्कर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाशाचा किरण
मराठवाड्यातीलशेतकरी सातत्याने आत्महत्या करत आहेत. पाऊस येतो-जातो. मात्र जीव दिल्यानंतर पुन्हा येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शेतकऱ्यांनो, लेकराबाळांना सोडून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना अडचणी सांगा. ते तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहेत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला. या उभारी पथकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात येणार आहे. अंधारात प्रकाशाचा किरण दाखवण्याचे काम ही पथके करणार असल्याचे त्यांनी सांगितले.