आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Wachannama On Last Day Of Rally In Aurangabad

प्रचाराच्या शेवटी आला युतीचा वचननामा, अशी दिली वचने - अशी आहे सध्यस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वरिष्ठ पातळीवर युती आणि वॉर्डस्तरावर नसलेले मनोमिलन यांचे दर्शन घडवणाऱ्या शिवसेना भाजप युतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपला वचननामा प्रकाशित केला.
पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या मनपाचे मूळ काम असणाऱ्या बाबींबाबत कोणताही कालबद्ध कार्यक्रम नसलेली आश्वासनांची यात रेलचेल असून डीएमआयसी, राष्ट्रीय महामार्ग या केंद्र सरकारच्या योजना आपल्याच असल्याच्या थाटात त्या कामांचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नावापुरती युती केलेल्या शिवसेना भाजपकडून राज्य केंद्रात त्यांचेच सरकार असल्याने ठोस वचननाम्याची अपेक्षा होती. प्रचाराच्या प्रारंभीच वचननामा देऊन त्यावर सांगोपांग चर्चा अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले. आज प्रचार संपण्याच्या काही तास आधी एका पत्रकार परिषदेत पालकमंत्री रामदास कदम भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वचननामा प्रकाशित केला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

वचन - २०३०पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून नवीन भूमिगत मलनि:सारण योजना
स्थिती- भूमिगत गटार योजना मागील काळातील असून त्याचे कामही सुरू झाले आहे. या योजनेच्या तपशिलाबाबत काहीच चर्चा नाही.

वचन - घनकचरा निर्मूलनाचा नवा प्रकल्प घेणार. नवीन डंपिंग ग्राऊंडची निर्मिती करणार.
स्थिती- नारेगाव चाकचरा डेपो हटवण्याचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मिटमिट्याला जागा मिळूनही तो स्थलांतरित करण्याचा निर्णय शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे होऊ शकला नाही.

वचन - शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी स्वतंत्र फेरीवाला विभाग करण्यात येणार आहे.
स्थिती- युतीनेआतापर्यंतच्या जवळपास सगळ्या निवडणुकांत हे आश्वासन दिले आहे. पण काहीच निर्णय नाही. त्यामुळे सर्वच भागांत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होतोच पण फेरीवाल्यांच्या माध्यमातून आपली राजकीय पोळीही सत्ताधारी भाजून घेत आहेत.

वचन - मनपाचे३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय बांधणार
स्थिती- सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून चर्चेत आहे. बीओटीवरील या प्रकल्पाबाबत काहीच निर्णय झालेला नाही. मनपाच्या सध्याच्या रुग्णालयांतील उपलब्ध सेवांत सुधारणा करण्याबाबत यात उल्लेख नाही. ऑपरेशन थिएटर असून कर्मचारी डॉक्टर नसल्याने सुविधा मिळत नाहीत. त्याबाबत काहीच आश्वासन नाही.

वचन - एका वर्षात शहरात सगळ्या प्रमुख मार्गांवर शहरबस सुरू करणार. पहिल्या वर्षी ५० ते १०० बसेस सुरू केल्या जातील.
स्थिती- औरंगाबादची गरज असलेली सिटी बस सेवा चालवण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेले सगळे उपाय अयशस्वीच ठरले. आधी एसटी नंतर एएमटीची पुन्हा एसटी असा प्रवास सुरू असून सेवा कोलमडली आहे.

वचन - समांतरच्या माध्यमातून नियमित, शुद्ध मुबलक पाणी देणार. हर्सूल तलावाच्या पाण्याचा योग्य वापर नवीन जलस्रोतांचा शोध घेणार नहरींचे संवर्धन करणार स्थिती- वादग्रस्तसमांतर जलवाहिनीचे काम कधी होणार याचा उल्लेख नाही. करारातील त्रुटी दूर करून नागरिकांचा त्रास शंकांचे निरसन कसे करणार याचा उल्लेख नाही.

वचन- प्राणिसंग्रहालय नवीन प्रशस्त जागेत हलवणार
स्थिती- प्रत्यक्षात सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हलवून सफारी पार्क तयार करण्याचा निर्णय पाच वर्षांपासून चघळला जात आहे. त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. सध्याच्या नवीन विकास आराखडा मंजूर होण्यातही अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे. त्याबाबत यात भाष्य नाही.