आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैतापूर वीज प्रकल्पावर शिवसेना राजी होईल, पीयूष गोयल यांचा विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना आधी सत्तेत सहभागी झाली नव्हती, त्यांनी सरकारला विरोध केला. नंतर ते सत्तेत आले. जैतपूर प्रकरणातही तसेच होईल आणि त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा दावा केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्राला विजेची गरज आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेत उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकल्प उभारला जाईल, असेही ते म्हणाले.

खासगी कार्यक्रमानिमित्त गोयल शुक्रवारी शहरात आले होते. जालना रस्त्यावरील एका हॉटेलातील पत्रकार परिषदेत जैतापूर प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता ते म्हणाले, या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज आहे. जर हा प्रकल्प झाला नाही तर विजेची कमतरता पडू शकते. ज्या राज्यांनी असे अणुप्रकल्प नाकारले तेच आता विजेची मागणी करताहेत. राज्यात विजेचे दर जास्त का आहेत, यामागे प्रकल्प येथे नसणे हे कारण असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे हा प्रकल्प झालाच पाहिजे, त्यासाठी शिवसेनेशी चर्चा करून योग्य व सकारात्मक मार्ग काढला जाईल, असा दावा त्यांनी केला. त्यासाठी शिवसेना आधी सत्तेत आली नव्हती, सरकारला विरोध केला; पण नंतर ते सत्तेत सहभागी झाले, असा शब्दप्रयोग केला. पत्रकार परिषदेस राष्ट्रीय महिला अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, ज्ञानोबा मुंडे, माजी नगरसेवक अनिल मकरिये आदी उपस्थित होते.

उद्योगाचे वीजदर कमी होण्याचे गोयलांचे संकेत
अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील वीजदर जास्त असल्याने येथील उद्योग अन्यत्र जातात. त्यावर गोयल म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मी तीन वेळा बैठका घेतल्या. सबंधितांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे वीजदरावर त्यावर लवकरच तोडगा निघेल. अन्य राज्यांच्या तुलनेत येथील दरही तेवढेच असावेत यासाठी काम सुरू आहे. मात्र निर्णय कधी घेतला जाईल, हे त्यांनी सांगितले नाही.

२४ तास वीज शक्य नाही
देशात आता विजेचा तुटवडा नाही. मात्र वितरण प्रणाली तसेच अन्य बाबींमध्ये त्रुटी आहेत. या त्रुटी एका वर्षात कमी होणाऱ्या नाहीत. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षे काही ठिकाणी २४ तास वीज देता येणार नाही. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनाही मुबलक वीज मिळेल, असा दावा त्यांनी केला. मोदी सरकार आल्यापासून ३२ मिलियन टन कोळशाचे उत्पादन झाले असून १ कोटी युनिटपेक्षा जास्त विजेची निर्मितीही याच काळात झाली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था सुधारली की सर्वत्र २४ तास वीज मिळणार असल्याचे ते म्हणाले. कोळसा खाणीचा लिलाव अत्यंत पारदर्शकपणे होत असल्याने यापासून सरकारच्या महसुलात मोठी वाढ होणार आहे. त्याचा वापर वीज वितरण प्रणालीतील सुधारणेसाठी होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...