आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 हजार शेतकऱ्यांना शिवसेना देणार प्रत्येकी ५० हजारांची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धार्मिक रंग असला तरी प्रत्येकाच्या सुख-दु:खात धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आजही कायम आहे. संकटाच्या क्षणी शिवसैनिक मैदान न सोडता मदतीला धावून जातात, याची प्रचिती दुष्काळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा येत आहे.

गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ झेलत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना पुन्हा एकदा सोबत आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार व शनिवार (११ व १२ सप्टेंबर) असे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५० हजाराची आर्थिक मदत तसेच गरजेच्या साहित्याचे वाटप केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३ हजार शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गतवर्षीही पक्षाचे स्थानिक नेते पुढे आले होते. यंदाही त्यांची आघाडी कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी दुष्काळाची पाहणी केली, तर सत्तेतील सहभागी असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अजून इकडे फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात खुद्द पक्ष कार्यकर्त्यांचा काहीसा टीकेचा सूर होता. मात्र, शेतकऱ्याच्या उंबरठ्यावर रिकाम्या हाताने जायचे नाही, शक्य होईल तेवढी मदत करायची, यासाठी पक्षाचे नेते, मंत्री व पदाधिकारी तयारी करत होते. त्यामुळेच दौऱ्याला विलंब झाल्याचे समजते.
उद्धव ठाकरे शनिवारी पैठण तालुक्याला भेट देण्याची शक्यता आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण तेथे जास्त आहे. दुष्काळाची पाहणी करण्याऐवजी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, यावर शिवसेनेचा भर असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दोन दिवसांत बहुतांश ठिकाणी पाहणी करण्याऐवजी मदतीचा हात पुढे करणार आहेत. शिवसेनेला याची अजिबात प्रसिद्धी नको आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन केले असतानाही यावर भाष्य करण्यास एकही पदाधिकारी तयार नाही. उद्धव ठाकरे स्वत:च घोषणा करतील, असे स्थानिकांनी सांगितले. मदतीसाठी नियोजन करण्याची जबाबदारी पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर असून त्यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
तालुका पातळीवर सामूहिक विवाहसोहळ्यांचे आयोजन
गतवर्षी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या ६७ मुलींचे कन्यादान केले. लग्नात लागणारे सर्व साहित्य त्यांनी दिले. त्यातून अनेकांना दिलासा मिळाल्याने या वर्षी प्रत्येक तालुका पातळीवर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे पक्षाने ठरवले आहे. जो कोणी म्हणेल त्या शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न या सोहळ्यात लावून दिले जाईल. त्यात मंगळसूत्रापासून सर्व गृहोपयोगी साहित्य सेनेकडून दिले जाणार आहे.
पालकमंत्री दुसऱ्यांदा शहरात
दरम्यान, पालकमंत्री कदम हे ठाकरे यांचा दौरा तसेच मदतीच्या नियोजनाचे काय झाले, याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा शहरात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी एकदा आढावा घेतला होता. आज पुन्हा त्यांनी तपासणी केली. कोठेही काही कमतरता पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे त्यांनी स्थानिकांना सांगितले. रात्री उशिरा ते मुंबईला परतणार होते. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी ते पुन्हा येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दौऱ्याचे नियोजन तसेच शेतकऱ्यांच्या मदतीची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

असे असेल मदतीचे स्वरूप
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पक्षाच्या वतीने खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्येकी १ लाख रुपये दिले आहेत. आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल. काहींना रोखीने मदत केली जाईल तर काहींना रोजगाराचे साधन, अवजारे, काहींना अन्नधान्य दिले जाईल.

गतवर्षीची मदत

- २२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना खा. खैरेंकडून प्रत्येकी १ लाख रुपयांची रोखीची मदत

- माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी दुष्काळग्रस्त ६७ शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान केले.