वाळूज - दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्या शेख निसार शेख शब्बीर या तरुणावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एका टोळक्याने पंढरपूर येथील बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी असा प्रयत्न करणार्या तरुणांना दंडुक्यांनी पिटाळून तो हाणून पाडला.
गोळीबाराच्या घटनेनंतर युवकांच्या एका टोळक्याने हुल्लडबाजीला सुरुवात केली. भाजी मंडईसह नगर-औरंगाबाद महामार्गावरील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत या टोळक्याला पिटाळून लावले. त्यामुळे दहशतीखाली बंद झालेली दुकाने पुन्हा सुरू झाली. सर्वत्र पोलिसांनी चोख संरक्षण व्यवस्था ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात, मात्र तणावग्रस्त आहे.
आरोपी युवकांचा पोलिसांकडून तपास : पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांनी घटनास्थळी सायंकाळी साडेसातला भेट देऊन तपासासाठी क ाही सूचना केल्या. घडलेली घटना, आरोपींची ओळख पटण्यासह इतर माहिती घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संजय अहिरे यांना शेख निसार याचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी रात्री उशिरा एका युवकास ताब्यात घेतले असून निसारच्या जबाबानंतरच खरा प्रकार उघडकीस येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याने त्याचा जबाब केव्हा नोंदवला जाणार, हे सांगणे क ठीण आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
पंढरपूर येथील गोळीबारात जखमी झालेल्या शेख निसार शेख बशीर (32, फुलेनगर, पंढरपूर) यांच्यावर घाटीमध्ये शस्रक्रिया करण्यात आली आहे. शस्रक्रियेनंतर डॉ. अन्सारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, बंदुकीची गोळी पोटात लागून खाली पडली असावी. कारण त्याच्या शरीरात गोळी नव्हती. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून धोक्याबाहेर आहे. गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे घाटी परिसरात सायंकाळी मोठा जमाव जमला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटीच्या अपघात विभागासमोर मोठा पोलिस बंदोबस्त दिला होता. पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव, पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी रुग्णाच्या नातेवाईकांची घाटीत भेट घेतली. सिटी चौकचे निरीक्षक नागनाथ कोडे आणि बेगमपुर्याचे श्रीपाद परोपकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
कोण आहे निसार?
शेख निसार हा येथील नव्याने वसलेल्या फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. तो मूळ वळदगाव (ता. औरंगाबाद) येथील असून त्याने मित्रमंडळाची स्थापना केलेली आहे. तो ब्रोकर म्हणून काम क रून कुटुंबाची उपजीविका भागवतो.
(फोटो - पंढरपूर बंद करण्याचा पयत्न करणार्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले.)