वाळूज - पंढरपूरयेथील नगर-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकाने चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली, परंतु चिल्लर रकमेशिवाय त्यांच्या हाती काही लागले नाही. तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत. पोलिस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
मुख्य महामार्गावर सिद्धिविनायक मेडिकल आहे. त्याच्या शेजारीच शांताई किराणा दुकान डॉ. सी. एम. जैन यांचा दवाखाना आहे. या तिन्ही दुकानांचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. त्यांनी दुकानातील वस्तूंची शोधाशोध केली. त्यानंतर काउंटरमध्ये रोख रक्कम आहे का, याचीही खात्री करून घेतली. मात्र, त्यात काही सापडले नाही. मेडिकलमधील तीन हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. त्यानंतर चोरट्यांनी वळदगाव रस्त्यावरील माउली हे खते बी-बियाणे विक्रीचे दुकान याच पद्धतीने फोडले. आतील सर्व सामान विस्कटण्यात आले आणि रोख रकमेचा शोध घेण्यात आला. परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात तीन चोरटे दुकानात घुसताना कैद झाले आहेत. हे चोरटे २८ ते ३० वयोगटातील आहेत. चोरीच्या घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यास माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने चारही घटनास्थळांवर जाऊन परिसराची पाहणी केली. सीसीटीव्हीतील चित्रिकरणाचीही त्यांनी तपासणी केली. तक्रार देण्यास कोणी पुढे आले नसल्यामुळे घटनेची पोलिसात नोंद नसल्याचे वाळूज एमअायडीसी ठाण्याचे ठाणे अंमलदार पी. बी. दिवटे यांनी सांगितले.
वळदगाव रस्त्यावरील माउली खते, बियाण्याच्या दुकानात चोरी करताना चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झाले आहेत. यावरून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.