आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडवट सैनिक, मेहनती शेतकरी अन् खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या विसाव्या महापौरपदी विराजमान झालेले त्र्यंबक तुपे हे कडवट शिवसैनिक असल्याचे सर्व परिचित आहे, पण हा निर्व्यसनी माणूस एक मेहनती शेतकरी, दिलदार खेळाडू अन् कुटुंबवत्सल व्यक्तीही आहे. राजकारणात कितीही व्यस्त असले तरी कुटुंबीयांना वेळ देणे, न चुकता दिवसातून एकदा जीममध्ये जाणे आणि आठवड्यातून दोनदा स्वत:च्या शेतात जाण्यास बिलकूल विसरत नाहीत. स्वत: राज्यस्तरावर कबड्डी खेळलेले तुपे हे वेगवेगळ्या स्पर्धा कायम आयोजित करत युवा खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात.
चौथीपर्यंतचे शिक्षण पीरबावडा (ता. फुलंब्री) या जन्मगावी झाले. पुढील शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादेतच झाले. शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांचा ओढा अभ्यासापेक्षा कबड्डी, खो-खो याकडेच जास्त होता. सरस्वती भुवन महाविद्यालयातून कलेची पदवी घेतल्यानंतर बी.पी.एड व पुढे एमएड केले. प्राध्यापकी करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु त्याआधीच ते शिवसेनेशी जोडले गेले होते. १९९५ मध्ये ते जयभवानीनगरातून पालिकेत विजयी होऊन गेले अन् पूर्णवेळ राजकारणी झाले. २००० मध्ये वाॅर्ड आरक्षणामुळे त्यांना लढता आले नाही. २००५ व २०१० मध्ये ते नगरसेवक होते. मधल्या काळात १ वर्ष ते स्थायी समितीचे सभापतीही राहिले.

शनिवारी भद्रा चरणी
तुपे हे पक्के हनुमान भक्त. दर शनिवारी न चुकता खुलताबाद येथे भद्रा चरणी लीन होतात. बाहेरगावी असले तरी शनिवारी ते खुलताबादला न चुकता जातातच. त्यासाठी बाहेरगावी जाण्याचे वेळापत्रकही त्यांनी अनेकवेळा बदलले आहे.

कुटुंबाला वेळ
एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असे तुपे यांचे चौकोनी कुटुंब, पण भाऊ, चुलतभाऊ या सर्वांच्या कुटुंबांना ते आपले कुटुंब म्हणून सांभाळतात. राजकारणात कितीही व्यस्त असले तरी कुटुंबाला वेळ देण्यास ते विसरत नाहीत. मुलगी सहावी तर मुलगा दुसरीत शिकतो. मुले अभ्यास, खेळाकडे लक्ष देतात की नाही, याबाबतीतही ते दक्ष असतात.
बातम्या आणखी आहेत...