आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडगाव कोल्हाटीत पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज एमआयडीसीलगत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील ग्रामस्थ तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. तब्बल तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणून त्यांना तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन ग्रामपंचायतीकडे नसल्याने परवड होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
वडगाव कोल्हाटी ही ग्रामपंचायत बजाजनगर ग्रुप ग्रामपंचायतीत येते. मात्र, बजाजनगर कामगार वसाहतीतला एमआयडीसी प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रकारे वडगावातील काही भागातही एमआयडीसीचे पाणी सुरू करण्यात आले आहे; परंतु हा पाणीपुरवठा तोकडा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
अनेकांची पाणी देण्याची तयारी
गावातील नागरिक तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ते किलोमीटर अंतरावरून उन्हातान्हात पाणी आणणे भाग पडत आहे. त्यांची ही केविलवाणी अवस्था अनेकांना पाहवली जात नाही. त्यामुळे येथील शरद भाऊसाहेब पवार हे स्वत: टँकरद्वारे गावाला मोफत पाणीपुरवठा करण्यास तयार आहेत. मात्र, तशी ग्रामपंचायतीने लेखी मागणी करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
टंचाई नेहमीचीच
वाळूज एमआयडीसीत काम करणारे अनेक कामगार वडगाव कोल्हाटी भागात राहतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे पाण्याची मागणी वाढली आहे; परंतु अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाणी घेण्यास तयार
- मोफत पाणीपुरवठा करण्यास जर कोणी पुढे येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे. शरद पवार यांना ग्रामपंचायतीतर्फे त्यांना पाहिजे तसे पत्र देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी गावाला पाणीपुरवठा करावा.
छायाबाई कार्ले, सरपंच, वडगाव कोल्हाटी
बातम्या आणखी आहेत...