आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचाच दुष्काळ, १६ मे रोजी पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अन्य पक्ष पुढे गेले असताना उशिरा का होईना १५ वर्षे कायम सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाग आली. आता येत्या १६ मे रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली असून वर्षभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या वेळी आर्थिक मदत केली जाणार आहे. याच्या तयारीसाठी बोलावण्यात आलेल्या शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांचाच दुष्काळ असल्याचे गुरुवारी दिसून आले.

जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, आठ तालुक्यांचे अध्यक्ष आणि शहरातील पक्षाचे नगरसेवक एवढीच मंडळी या बैठकीला होती. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या बैठकीचा समारोप साडेबारा वाजता झालाही. पवार यांच्या उपस्थिती होणारी ही दुष्काळी परिषद नेमकी कोठे होणार, हे कालपर्यंत कार्यकर्ते सोडाच, पदाधिकाऱ्यांनाही माहीत नव्हते. आजच्या बैठकीत स्थळ नक्की असल्याचे सांगण्यात आले. आमदार सतीश चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी ४.३० वाजता ही परिषद होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त गर्दी कशी करता येईल, यावर येथे चर्चा झाली. या बैठकीसाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. परंतु गंगापूर तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांतून फारसे कार्यकर्ते इकडे फिरकले नाहीत. तरीही चिकटगावकर यांनी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नियोजन केले. शिवसेनेच्या वतीने गतवर्षी आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेस रोखीने मदत करणार असल्याने हा आकडा किती असेल, याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. परंतु पक्ष फंडातून ही मदत करण्यात येत असून हा आकडा सर्वोच्च नेते स्वत: ठरवणार आहेत. तुम्ही फक्त गर्दीचे बघा, असा संदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मदत रोखीने की अन्य स्वरूपात, माहिती नाही

पक्षाच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत ही रोखीने असेल की शिवसेनेने यापूर्वी केलेल्या मदतीप्रमाणे संसारोपयोगी वस्तूंच्या रूपाने असेल याचे स्वरूप अजून स्पष्ट झालेले नाही. एप्रिल २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत केली जाईल. पुढील चार दिवसांत अन्य तपशील समोर येईल, असे कोकाटे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...