आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:ख पचवून आनंद देणाऱ्या सर्कशीची अनोखी कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वत:च्या आयुष्यातील दु:ख पचवून इतरांना आनंदाचे क्षण देणारे ग्रेट बॉम्बे सर्कसचे कलावंत खऱ्या अर्थाने ग्रेट आहेत. येथील प्रत्येक कलावंत म्हणजे एक स्वतंत्र कादंबरीच! प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. "मेरा नाम जोकर'मधील राज कपूर असो अथवा "धूम थ्री'तील अामिर खान यांच्या भूमिका लेखकांना अशाच कलावंतांतून सापडल्या, हे येथील सर्कस पाहिल्यानंतर लक्षात येते. यातील काही कलावंतांच्या या बोलक्या कहाण्या...

इतरांना मिळते हसण्याची संधी
सोलापूरहून १५ किलोमीटर अंतरावरील तिरे गावचे रहिवासी ४२ वर्षीय हरी जावळे १९ वर्षांपूर्वी दहावी नापास झाले. त्याच वेळी कुटुंबातील इतर भावंडे उत्तम शिक्षण घेत होती. नापास झाल्याने नंतर शाळेत जाण्याची हिंमत झाली नाही. अनेक ठिकाणी नोकरी शाेधली; पण यश आले नाही. कुटुंबीयांनी गुरे राखण्यास सांगितले. सोलापुरात आलेली सर्कस पाहण्यासाठी गेलो असता हीच आपली जागा असल्याचा त्यांच्या मनाने ठाव घेतला. तेव्हापासून आजपर्यंत ते प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे काही मित्र प्राचार्य, तर काही आयपीएस झाले; पण हरी मात्र जोकरच राहिले. माझ्या निमित्ताने प्रेक्षकांना हसण्याची संधी मिळते, हाच माझ्या जीवनातील खरा आनंद आहे, असे ते म्हणतात.
सर्कशीने दिले खरे आयुष्य
उत्तराखंडमधील पितोरा या गावातून विजयकुमार हे १२ व्या वर्षी बाहेर पडले. वडील शेतकरी असल्याने घरातील परिस्थिती बेताचीच. चंदिगड येथे फिरण्यासाठी गेले असता सर्कस पाहिली आणि त्याच्या प्रेमात पडले. त्या क्षणी ते सर्कशीच्या मालकांना भेटले व सर्कशीमध्ये घेण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर चंदिगडहून मेरठपर्यंत त्यांच्या पाठीमागे गेले. दिसायला गोरेगोमटे असल्याने लहान मुलीचे काम करण्यासंबंधी विचारणा झाली. त्यांनी आनंदाने ही ऑफर स्वीकारली. आज ते ४१ वर्षांचे असून सर्कसच घर असल्याचे सांगतात. नवीन कलावंतांना प्रशिक्षण देण्याचे काम ते करतात. कलावंत जेव्हा टाळ्या िमळवतात, तेव्हा त्यांचा आनंदाने ऊर भरून येत असल्याचे ते सांगतात.

भारतीय कधी झाले, हे समजलेच नाही
साडेतीन वर्षांच्या असताना सेतू राजेश यांनी पहिल्यांदा सर्कसमध्ये काम केले. त्या मूळ चीनच्या. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करायचे. चीनचा एक ग्रुप भारतीय सर्कसमध्ये कला दाखवण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब सोबत आले. त्या वेळेसपासून सेतू येथेच आहेत. या सर्कशीमध्ये त्या ३० वर्षांपासून काम करतात. पुरुषांच्या बरोबरीने सेतू साहसी प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. सर्कशीत त्या लिहिणे, वाचणे शिकल्या. आज त्या अस्खलितपणे इंग्रजी बोलतात. बाहेरच्या जगात मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेकदा चर्चा होते. मात्र, सर्कशीतील मुली सुरक्षित आहेत. भारतीयांनी कधी आपले करून घेतले, हे समजलेदेखील नाही, असे त्या म्हणाल्या.