आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयोवृद्ध जोडप्यासह महिला उपसरपंच रानातच पाल ठोकून करताहेत श्रमदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- तालुक्यातील पळसवाडी येथील वयोवृद्ध पती-पत्नी आणि महिला उपसरपंच यांनी जलसंवर्धनाचा ध्यास मनी बाळगून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता गावाच्या परिसरातील रानात कामाच्या ठिकाणी पाल (झोपडी) ठोकून श्रमदान करत आहेत. पळसवाडी येथील महिला उपसरपंच इंदुबाई गायकवाड (वय ५८) आणि सय्यद कासमभाई (वय ६५) व त्यांच्या पत्नी जारिनाबी (वय ६०) हे कामाच्या ठिकाणी तंबू ठोकून मुक्कामी राहत असून पाणी फाउंडेशनअंतर्गत सीसीटी, माती बांध, दगडी बांध, शेती  बांध-बंदिस्ती, समतल चार, वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदणे अशी विविध कामे पाच मेपासून करत आहेत.  २२ मेपर्यंत त्यांनी गावात न जाता श्रमदानाचा संकल्प केला असून यादरम्यान कितीही जवळचे लग्नकार्य किंवा अंत्यसंस्कारही असले तरी श्रमदान सोडून जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

खुलताबाद तालुक्यात पाणी फाउंडेशनअंतर्गत आयोजित वॉटर कप स्पर्धेत ३७ गावांनी आपला सहभाग नोंदवला असून याअंतर्गत तालुकाभर सीसीटी माती बांध, दगडी बांध, शेतीबांध-बंदिस्ती  पाणी जिरवण्यासाठी समतल चार, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे आदी कामे जोरात चालू आहेत. यात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक श्रमदानासाठी सहभागी होत आहेत. या सामाजिक ध्येयानेच प्रेरित होऊन उपसरपंच इंदुबाई गायकवाड, सय्यद कासमभाई, त्यांच्या पत्नी जारिनाबी यांनी कामाच्या ठिकाणीच तंबू ठोकून श्रमदानाला वेळ द्यायचे ठरवून त्यांनी जलसंवर्धनाची कास धरली आहे.

पळसवाडी परिसरातील नंदाबाई हरिश्चंद्र दिवाणे यांच्या गट नंबर १०८, १०९ येथे सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामासाठी कासमभाई त्यांच्या पत्नी जारिनाबी व उपसरपंच इंदुबाई गायकवाड यांनी घरदार सोडून काम सुरू असलेल्या ठिकाणी पाल (झोपडी) ठोकून श्रमदान करत आहेत.   कासमभाई  हे अंबाजोगाई येथून पाणी फाउंडेशनअंतर्गत प्रशिक्षण घेऊन आले आहेत. दरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यासाठी खड्डे करण्यात येत आहेत. वयोवृद्ध असूनही तरुणांना लाजवेल असे काम उपसरपंच इंदुबाई, कासमभाई, त्यांच्या पत्नी जारिनाबी  करत असल्याने त्यांचा हा संकल्प पाहून मोठ्या संख्येने तरुण श्रमदानात सहभाग नोंदवत आहेत.

अशी आहे दिनचर्या
सकाळी उठल्यावर श्रमदानाच्या कामाला सुरुवात करण्यात येते. दुपारी १२ ते ३ या वेळेत जेवण व  आराम केल्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत श्रमदान  उपसरपंच इंदुबाई, कासमभाई, त्यांच्या पत्नी जारिनाबी  करत आहेत.
 
फुलंब्री: श्रमदानास कुणी पुढे येत नाही म्हणून घेतले स्वत:ला कोंडून
फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण येथे पाणी फाउंडेशनद्वारे सुरू असलेल्या कामावर श्रमदान करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत नसल्याने उद्विग्न झालेल्या तरुणाने गुरुवारी मौनव्रत धारण करून मंदिरात स्वत:ला कोंडून घेतले. दरम्यान, श्रमदान करण्यासाठी ग्रामस्थांनी शपथ घेतल्यानंतरच चार तासांनी तरुण मंदिरातून बाहेर आला. दत्तू वाघ असे या तरुणाचे नाव आहे.

तालुक्यातील नायगव्हाण या गावानेही या कार्यक्रमांतर्गत वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेला असून पंधरा दिवसांपूर्वी कामही सुरू झाले. सुरुवातीचे काही दिवस ग्रामस्थांनी उत्साहात श्रमदानही केले. यात दत्तू वाघ या तरुणाने पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला. श्रमदान करण्यासाठी ग्रामस्थ येत नसल्याने दत्तू वाघने कानिफनाथ मंदिरात गुरुवारी सकाळी दहा वाजता स्वतःला बंदिस्त करून घेतले. 
बातम्या आणखी आहेत...