आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shravan Special: Amruteshwar Mahadev Temple Hide In Crowd

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण विशेष: औरंगाबादच्या गर्दीत लपलेला जाज्वल्य अमृतेश्वर महादेव..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभारवाडा हा भाग प्रचंड गर्दीचा अन् बाराही महिने गजबजलेला असतो. या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे जागृत अन् जाज्वल्य असे परमशांत स्थान आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असले तरी मूळ महादेवाचे मंदिर असल्याचे फार थोड्या लोकांना माहिती आहे. 100 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असली तरी महादेवाची पिंड ही स्वयंभू असल्याचे येथील पुजारी सांगतात.


औरंगपुरा भाजी मंडईकडून सुपारी मारुतीकडे जाताना रस्त्यावरच अमृतेश्वराचे भव्य मंदिर लागते. या ठिकाणी संत रंगनाथ महाराज या सिद्धकोटीला पोहोचलेल्या संतांचे वास्तव्य होते. त्यांच्या काळातच साधारण 100 वर्षांपूर्वी येथे श्रीराम मंदिराची स्थापना झाली. समोरच दोन मारुती आहेत. एक मारुती दक्षिणमुखी असून सोबत शनिदेव असलेले शहरातील हे एकमेव मंदिर आहे. मंदिर जुन्या सागवानी लाकडात बांधलेले असून अजूनही सुस्थितीत आहे. याच मंदिरात एका कोपर्‍यात अत्यंत पुरातन असे अमृतेश्वर महादेव आहे. ही मूर्ती स्वयंभू असून खूप जुनी आहे. याचा कालावधी नेमका माहिती नसल्याचे पुजारी कुटुंबातील मंदाकिनी व्यवहारे यांनी सांगितले.


जंगल गायब झाले : पूर्वी या ठिकाणी जंगल होते. घनदाट वनराईत हा स्वयंभू महादेव होता. त्यानंतर रंगनाथ महाराजांनी या ठिकाणी राम मंदिर उभे केले. आधी हे स्थान अमृतेश्वर महादेवाचे असल्याने या मंदिराला अमृतेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे दर्शनाला गेल्यावर अनेक देवांची भेट होते. समोरच दक्षिणमुखी मारुती व शनिदेवाचे दर्शन होते. आत गेल्यावर भव्य चौकोनी जुन्या वाड्यात राम-सीता, लक्ष्मण, मारुती यांच्यासह राधाकृष्ण, विठ्ठल रुख्मिणी यांच्या छोट्या पण अत्यंत रेखीव मूर्ती आहेत. त्यासमोर मारुतीची आणखी एक छोटीशी पण अत्यंत विलोभनीय मूर्ती आहे. या सर्वांचे दर्शन घेताना इथे कुठे महादेवाचे जाज्वल्य स्थान आहे याचे भान राहत नाही. जुन्या लोकांना हे माहिती आहे, पण नव्याने आलेल्या भाविकाला महादेवाची खरी माहिती नसल्याने तो दुरूनच दर्शन घेऊन निघून जातो. त्यामुळे गर्दीत असूनही हा जागृत महादेव लपलेलाच दिसतो. एखाद्याने जिज्ञासेने विचारल्यावर पुजारी मंडळी ही माहिती देतात.

रंगनाथ महाराजांचे वंशज : भर गर्दीच्या ठिकाणी असूनही या मंदिराच्या आत गेल्यावर परमशांतीचा अनुभव येतो. एक एक मूर्ती पाहून मन हरखून जाते.आजही या मंदिरात रंगनाथ महाराजांचे वंशज पुजारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आडनाव व्यवहारे आहे. हे सर्व कुटुंब अत्यंत भक्तिभावाने रामनवमी, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरे करतात. श्रावणात जुनेजाणते भाविक येतात.