आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण विशेष: सोळाव्या शतकातील तळेश्वर महादेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऐतिहासिक मकबरा रोडकडे जाताना उजव्या बाजूला 16 व्या शतकातील तळेश्वर महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील महादेवाची पिंड स्वयंभू आहे. औरंगाबाद येथे वास्तव्य असताना त्या काळी मिर्झाराजे जयसिंह या ठिकाणी दररोज पूजेला येत, असे विश्वस्त सांगतात. या जुन्या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला.

शहरात अनेक पुरातन महादेव मंदिरे आहेत. बहुतांश मंदिरे बांधण्यात आली आहेत, पण फार थोडी मंदिरे ही स्वयंभू आहेत. त्यापैकीच एक आहे हा पहाडसिंगपुर्‍यातील तळेश्वर महादेव मंदिर. मकबर्‍याला जाताना पांढरा शुभ्र कळस असलेले हे छोटेसे मंदिर पाहून हे इतके पुरातन आहे याची पुसटशी कल्पना येत नाही. पूर्वी या मंदिराला बरीच मोठी जागा होती. काही जागेचा वाद आता न्यायालयात सुरू आहे.

भूमिगत अनोखी पाइपलाइन
परिसरातील नागरिकांनी 2001 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विश्वस्त मंडळही फार जुने असून विनायकराव थत्ते यांनी 1972 मध्ये त्याची नोंद केली. महादेवाच्या पिंडीसमोरच पुरातन गणेशाची रेखीव मूर्ती आहे. या मंदिरात अभिषेकाचे पाणी टाकल्याबरोबर ते लगेच नाहीसे होते. ते कोठे जाते हे कळत नाही. ही भूमिगत पाइपलाइन या मंदिरात आहे. या ठिकाणी विठ्ठल-रखुमाई, शंभर वर्षांपूर्वीचे मारुती मंदिरही आहे. तसेच दाजी महाराज टाकळीकर यांची मूर्ती आहे. र्शावण महिना, महाशिवरात्र यासह आषाढी आणि कार्तिकी एकादशी, हनुमान जयंतीसह, दाजी महाराजांचा उत्सवही या ठिकाणी मोठय़ा भक्तीभावाने साजरा केला जातो.

मंदिराला जुना इतिहास
पहाडसिंगपुरा भागातील हे मंदिर यादवकालीन असल्याचे येथील विश्वस्तांचे म्हणणे आहे. सोळाव्या शतकापासून त्याची पूजा-अर्चा नियमित सुरू आहे. औरंगाबाद शहराचा शिल्पकार मलिक अंबर याने जी नहर शहरात तयार केली त्याच्या काठावरच हे मंदिर होते. त्याने या मंदिरासाठी एक छोटे तळेही तयार करून दिले होते. त्यामुळेच याला तळेश्वर महादेव असे नाव पडले. छत्रपती संभाजीराजांचे वास्तव्य या शहरात असताना मिर्झाराजे जयसिंग यांचाही मुक्काम येथे होता तेव्हा मिर्झाराजे या मंदिरात दर्शनाला येत, अशी माहिती मंदिराचे विश्वस्तांनी दिली.

नवसाला पावणारा महादेव
हा महादेव स्वयंभू असून जागृत व नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. आमचे ट्रस्ट दरवर्षी धार्मिक कार्यासह सामाजिक कामही करते. यात गरीब खेळाडू, विद्यार्थी यांना मदत करणे, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे आदी कामे केली जातात.
-रवींद्र सुतवणे, अध्यक्ष, तळेश्वर मंदिर ट्रस्ट