आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shravan Verul Ghrushneshawr Tempal Terms And Condition News

अर्धवस्त्र दर्शनावर गलबला : जाणून घ्या, ज्योतिर्लिंग दर्शनाला काय आहेत नियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळमध्ये घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पुरुषांनी अर्धवस्त्राने गाभार्‍यात जाण्याची पूर्वापार परंपरा आहे. श्रावणातील दर्शनार्थी व लेण्यांमुळे येणारे विदेशी पर्यटक पाहता ही परंपरा मोडीत काढण्याची मागणी पुढे येत आहे. त्यातच ही अट योग्य नसल्याचे मत मांडून अ.भा. आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता बाबा हटयोगी यांनी याबाबत नाशिकच्या कुंभमेळ्यातील संत समाज संमेलनात निर्णय घेण्याची ग्वाही अलीकडेच दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणच्या नियमांचा हा ऊहापोह...
श्रावण महिना सुरू झाला असून, राज्यातील पाचही ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सोमवारी दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे. त्यातच वेरूळ येथील घृष्णेश्वर दर्शनासाठी पुरुषांना घालण्यात आलेल्या अर्धवस्त्राच्या अटीवरून वादंग सुरू झाले आहे. राज्यात त्र्यंबकेश्वर वगळता इतरत्र कोठेही भाविकांना दर्शनासाठी अशी कोणतीही अट नाही.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वराचे गाभार्‍यातील दर्शन मात्र सोवळे नेसून किंवा ओलेत्या वस्त्रानिशी घ्यावे लागते. गाभार्‍यात दर्शनासाठी ही अट आहे. केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो. शिवाय या ठिकाणी केवळ हिंदू धर्मीयांनाच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. त्यामुळे विदेशी, इतर धर्मीय लोक इकडे जात नाहीत, अशी माहिती देवस्थानचे सचिव अ‍ॅड. श्रीकांत गायधनी यांनी दिली. परळीतील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सर्वांना मुक्त प्रवेश दिला जातो. या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी वेगळी रांग तेवढी असते, असे विश्वस्त राजेश देशमुख यांनी सांगितले. औंढा नागनाथ येथेही असा कोणताही नियम नसल्याचे संस्थानचे सचिव दिलीप चव्हाण यांनी सांगितले. भीमाशंकर येथील शिवलिंगाचे दर्शनही सहजपणे मिळते. आबालवृद्धांना मुक्त प्रवेश असतो, असे विश्वस्त रत्नाकर कोडोलीकर यांनी सांगितले. एकंदर राज्यातील इतर ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शनार्थींना सोयीस्कर ठरतील असेच नियम आहेत. त्र्यंबकेश्वर येथे सोवळ्याचा तर वेरूळ येथे अर्धवस्त्र दर्शनाचा नियम आहे. त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे.
नियम रद्द करण्याची मागणी पर्यटकांची, भाविकांची नाही
अर्धवस्त्र दर्शनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. भाविकांचा त्यास आक्षेप नाही. ही परंपरा मोडीत काढण्याची मागणी पर्यटकांची आहे. या नियमाला शास्त्रोक्त आधार शोधला जात आहे. भाविकांच्या श्रद्धेचाही विचार केला जाईल, अशी घृष्णेश्वर देवस्थानची भूमिका आहे.
अर्धवस्त्र दर्शनाच्या नियमाबाबत भाविकांना अभिप्राय पाठवण्याचे आवाहन केले आहे. मंदिरातही रजिस्टर ठेवले आहे. महिनाभरात येणार्‍या प्रतिक्रियांतून काही आधार मिळतो काय हे तपासले जाईल, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य यांनी म्हटले आहे. आतापर्यंत 20 ते 25 लेखी सूचना आल्या आहेत. बहुतांश भाविक नियम कायम ठेवावा असेच म्हणतात. श्रावण भाविकांचा महिना असतो. एरव्हीही भाविक येतात. पण डिसेंबरच्या सुमारास पर्यटकांचा मोसम सुरू होतो. या पर्यटकांनाच नियम अडचणीचा वाटतो. रद्द करण्याचा आग्रह त्यांचाच असतो.. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. कैक वेळा तर तेच पर्यटकांची समजूत काढतात. सभामंडपातून कपड्यांनिशी दर्शन घेता येते. घृष्णेश्वर मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही हे लेणी पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांनी समजून घेतले पाहिजे, असेही वैद्य यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये,
त्र्यंबकेश्वरात सोवळे नेसून वा ओलेत्याने हिंदूंनाच दर्शन
परळी, औंढा, भीमाशंकर येथे सर्वांना मुक्त प्रवेश; चित्रीकरणावर निर्बंध