आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखतीपासून वंचित विद्यार्थ्यांसाठी वेगळे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - श्रीयश प्रतिष्ठान आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठवाडा जॉब फेअर’च्या दुसर्‍या दिवशी 29 कंपन्यांनी सहभाग नोंदवला. काल व आज मिळून दोन दिवसांत अडीच हजार विद्यार्थ्यांपैकी एक हजार 71 विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या असून 316 विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे, असा दावा प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांत धर्माधिकारी यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

या पुढील प्रक्रिया 17 फेब्रुवारीनंतर सुरू होईल. पाचशे विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे. मुलाखतींपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे नियोजन करून त्यांनाही संधी देण्यात येईल तसेच जॉब फेअरमध्ये सहभागी होऊ न शकणार्‍या कंपन्यांना पुन्हा निमंत्रित करून तसे संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. धर्माधिकारी म्हणाले की, मुलाखतीला आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक, ई -मेल आयडी आणि पत्ते आम्ही नोंदवून घेतलले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या प्रयत्नानंतर सगळ्या कंपन्यांना एकत्र आणण्यात आम्ही यशस्वी झालो.

ज्या कंपन्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाही. त्यांना पुन्हा बोलावल्या जाणार आहे. अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, एमबीए, बीसीएस, बीबीए, फार्माच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी नोकरीची संधी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. त्यांना मुलाखतीचा अनुभव देण्यासाठी व उद्योगाला कौशल्यपूर्ण कामगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि कंपन्या यांना एका व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या मेळाव्यात डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मोठय़ा प्रमाणावर मिळाल्यामुळे अभियांत्रिकीचे विद्यार्थी नाराज असल्याचेही चित्र दिसून आले. यापुढे होणार्‍या नोकरी मेळाव्यात अभियांत्रिकी, एमबीए आणि इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट करण्यात यावी. अशी अपेक्षा अमित राऊत, सचिन गाढे, राम पाटील, रोहन सांळुके, जागृती सोळुंकी, अनिता शेप आदी विद्यार्थ्यांंनी व्यक्त केली. या मेळाव्यात राहिलेल्या त्रुटीचा विचार करून पुढील मेळावा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही धर्माधिकारी यांनी दिले आहे. मेळाव्यासाठी औरंगाबादसह जालना, बीड, अंबाजोगाई, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, मुंबई, पुणे येथून विद्यार्थी आले होते.

‘डिप्लोमा’च्या विद्यार्थ्यांना कंपन्यांचे प्राधान्य
अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक या दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कामात सहभागी करून घेण्यासाठी मेहनत करून घ्यावी लागते. उद्योगात नवनवीन अद्ययावत मशिनरी आल्या आहेत. त्यासाठी डिप्लोमाचे विद्यार्थी उत्तमरीत्या काम करू शकतात, असे मत ग्रीव्हज कॉटनचे एचआर व्यवस्थापक लक्ष्मीकांत खिस्ती यांनी व्यक्त केले. ग्रीव्हज कॉटन कंपनीतर्फे 50 विद्यार्थ्यांची शॉर्ट लिस्ट तयार क रण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या मेळाव्यात गुणवत्ताधारक विद्यार्थी सहभागी झाल्याचे मत एक्स्पर्ट ग्लोबलचे एचआर व्यवस्थापक अमृता देशपांडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि उद्योजकांना एवढय़ा मोठय़ा संख्येने एकत्र आणण्याच्या प्रयत्नाचे उद्योजकांनी कौतुक केले.