आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या विकासासाठी एवढे सोबत राहिलात तरी पुरेसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार इम्तियाजजलील यांनी आठवडाभरापूर्वी कटकट गेटला रस्ता, पुलाच्या कामासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना निमंत्रण देण्याचा विषय काढला. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांसह तेथील नागरिकांनी हलकल्लोळ केला. कदमांसोबत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे यांनाही बोलावले पाहिजे, असे इम्तियाज म्हणताच विरोध टिपेला पोहोचला. आमच्या इलाख्यात त्यांचे काय काम? त्यांना कशासाठी बोलावता ज्यांच्याशी आपले टोकाचे वैर आहे. ज्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवली. त्यांच्यावर टीकेचे वार केले. सध्याही करत आहोत आणि यापुढेही तेच करणार आहोत. त्यांना बोलावून काय साध्य होणार? त्याने फायदा तर काहीच होणार नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीला आपल्याविरोधात एक चांगला मुद्दा मिळेल. कट्टरपंथी मुस्लिम दुखावतील. आपल्यापासून दूर जातील. तुम्ही तर आपल्या व्होट बँकेलाच धक्का देताय, असे त्यांचे म्हणणे होते. कटकट गेट हा अत्यंत संवेदनशील भाग. येथे मुस्लिमांचे प्रचंड प्राबल्य आहे. इथे कधीच शिवसेनेचा प्रवेश झाला नव्हता. तो तुम्ही का करून देता, असाही सवाल होता. मात्र, इम्तियाज स्वत:च्या मुद्द्यावर ठाम राहिले. जे काही राजकारण करायचे ते निवडणुकीत केलेच पाहिजे, पण विकासकामात जात, धर्म, पंथ, पक्ष येताच कामा नये. कटकट गेटचा रस्ता, पुलाचा विकास गेल्या २० वर्षांपासून रखडला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री कदमांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला असेल, तर त्यांच्याच हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय कायम मुस्लिमविरोधी भूमिका घेऊनच पाय रोवलेल्या खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाहुणे म्हणून बोलावून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. एमआयएम म्हणजे हिंदूंच्या मुळावर उठलेला पक्ष. एमआयएमला दंगली घडवण्यात स्वारस्य आहे. कट्टरपंथी मुस्लिमांना विकासकामांशी काही देणे घेणे नाही, हा इतर समाजांमध्ये रुजलेला समज दूर करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे, असे त्यांनी पटवून दिले. आणि एकेकाळी दंगलप्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकट गेट भागात कपाळावर भगवे टिळे, गळ्यात भगवे रुमाल घातलेल्या सेना नेते, पदाधिकाऱ्यांचे भलेमोठे बॅनर झळकले. कदमांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी झाली. औरंगाबादच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग म्हणून त्याची नोंद झाली आहे. कदम यांच्या नेतृत्वगुणाचेही करावे तेवढे कौतुक कमीच आहे. शिवसेना मुस्लिमविरोधक नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले. यातून अनेक प्रकारचे संदेश दिले गेले. विशेषत: राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वर्षानुवर्षे काँग्रेसची व्होट बँक म्हणून राहिलेल्या मुस्लिम समाजाने त्यावर साधकबाधक चर्चा केली. विशेषत: तरुणांमध्ये इम्तियाज जलील यांच्या भूमिकेचे नाइलाज म्हणून स्वागत करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे हिंदू-मुस्लिमांमधून आडवा विस्तूही जात नाही. एमआयएमच्या आगमनामुळे तणाव आणखीनच वाढणार आहे, हा समज काहीअंशी का होईना दूर होईल, असे वातावरण कटकट गेटच्या कार्यक्रमात दिसून आले. माजी महापौर रशीद मामू नेहमी असे म्हणतात की, जेव्हा जेव्हा हिंदू-मुस्लिम एक येण्याच्या प्रयत्नात असतात. काही नेतेमंडळी त्यांना एकत्र आणण्यासाठी धडपडत असतात. तेव्हा एखादी क्षुल्लक घटना अशी काही घडते की तिचा भडका उडून तयार होणाऱ्या आगीवर अनेक मंडळी स्वत:ची पोळी भाजून घेत असतात. आताही कटकट गेटच्या सोहळ्यानंतर ही मंडळी कार्यरत झालीच असणार. त्यांना वेळीच पायबंद घालण्याची जबाबदारी आमदार इम्तियाज यांनाच घ्यावी लागणार आहे. कारण त्यांनी मुस्लिम समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पावले टाकणे सुरू केले आहे. एमआयएमचा मूळ पाया कट्टरपंथी मुस्लिमांचा असला तरी बदलत्या काळानुसार विकासकामे ही बहुसंख्य मुस्लिमांची मानसिकता आहे. धर्माचे टोकाचे पालन करत असताना आपल्या भागात चांगले रस्ते, दर्जेदार दवाखाने, उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा असाव्यात, कचरा नियमितपणे उचलला जावा, असे त्यांनाही वाटत असते. त्याकडेही एमआयएमला अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आणि आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक असलेल्यांचीही मदत घेण्यात, त्यांचा पाहुणचार करण्यात काहीच गैर नाही. महापालिकेचा ताबा, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून कामे करून घेऊयात. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर तुटून पडूयात, असा विचार ते रुजवत आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि दुसरीकडे एमआयएम असा दुहेरी समतोल त्यांना साधावा लागणार आहे. आणि हे करताना मुस्लिमांच्या मतावर डोळा ठेवून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीलाही घुसखोरीपासून रोखायचे आहे. औरंगाबादेत सध्या शिवसेना-एमआयएमचे प्राबल्य आहे. हे दोन्ही पक्ष असेच विकासकामांसाठी एकमेकांसोबत राहिले, तरी ते पुरेसे आहे. राजकारण, समाजकारणात अलीकडील काळात प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या आधारावरच केली जात अाहे. दोन समाज एकमेकांजवळ येताच कामा नये, यासाठी भिंती उभारल्या जात असताना या भिंतींचा पाया खणण्याचे काम इम्तियाज यांनी सुरू केले आहे. त्याला मुस्लिम समाजातून कितपत प्रतिसाद मिळतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...