आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रेयनगरातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रेयनगर येथे सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार गोलमाल उत्तरे देत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेतली. या रस्त्याच्या कामाचा दर्जा दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून तपासा आणि तत्काळ चौकशी अहवाल पाठवा, असे आदेश त्यांनी देताच मुख्य अभियंता सी.पी.जोशी यांनी तसे पत्रच अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांना दिले. दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांपाठोपाठ आता विभागीय आयुक्तांनीही या निकृष्ट कामाचा खुलासा मागवला आहे.
निकृष्ट सामग्रीचा वापर, तांत्रिक दोष आणि काम उरकण्यावर जोर यामुळे श्रेयनगरात झालेला सिमेंट रस्ता महिनाभरातच उखडला. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील खाबूगिरीमुळे रस्त्याला खड्डे पडत आहेत. या खाबूगिरी आणि दिरंगाईचा ‘डीबी स्टार’ने ‘श्रेयनगरातील काँक्रीटच्या रस्त्याला भ्रष्टाचाराचे तडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून पर्दाफाश केला. त्यानंतर जागरूक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनीही वृत्ताची गंभीर दखल घेतली. त्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून या रस्त्यांची अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रक मंडळामार्फत तपासणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता सी.पी.जोशी यांना दिले.

जोशी यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ विभागाचे अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांना तत्काळ रस्त्याची गुणवत्ता तपासण्याचे पत्र दिले. त्यात तत्काळ चाचणी अहवाल सादर करावा, असेही म्हटले आहे.

विभागीय आयुक्तांनी मागवला खुलासा
विभागीय आयुक्तांनीही सामान्य प्रशासनाच्या उपआयुक्तांमार्फत याप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यांनी विभागीय उपायुक्त सामान्य प्रशासन डॉ. विजयकुमार फड यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.बी.मोरे यांना खुलासा सादर करण्याचे पत्र पाठवले आहे.