आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगादच्या लेणीवरून - धाक उरला नाही म्हणून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महत्त्वाच्या पदावरील जबाबदार माणसे बेजबाबदारपणे वागू लागतात, तोंडाला येईल तसे बोलू लागतात, मनाला वाटेल तसे वागू लागतात, तेव्हा त्या संस्थेचे अध:पतन सुरू झाले आहे, याची खात्री बाळगावी. औरंगाबाद महापालिकेत असेच सुरू झाले आहे. दर चार-पाच दिवसांनी नवीनच वाद निर्माण होत आहे.
कधी नगरसेवक तर कधी पदाधिकारी आणि काही वेळा अधिकारी किरकोळ वादाच्या निखाऱ्यावर फुंकर घालून भडका उडवून देत आहेत. त्यात आता आयुक्त प्रकाश महाजन आणि भाजपचे गटनेते संजय केणेकर यांची भर पडली आहे. दोघांनीही किरकोळ मुद्द्यावरून मर्यादा ओलांडल्या. धुळ्याहून माणसे आणून हातपाय तोडीन, असे धमकावण्यापर्यंत आयुक्तांची मजल गेली, तर केणेकरही शिवीगाळीवर उतरले. एखाद्या गल्लीतील मुलांच्या भांडणासारखा हा प्रकार होता. यावरून दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या महापालिकेत सध्या नेमके काय सुरू आहे, हे तर कळतेच; शिवाय पुढे काय वाढून ठेवले आहे याचाही अंदाज येतो.
आता एखाद्या दिवशी आयुक्त व नगरसेवकांमध्ये हाणामारी होऊन अगदी कपडे फाडण्यापर्यंत घटना घडली तरी आश्चर्य वाटायला नको. हे सारे कशामुळे घडते आहे, याचा थोडासा शोध घेतला तर ‘धाक नसल्यामुळे’ असे उत्तर मिळते. बहुतांश नगरसेवकांना लोकांचा, काही लोकांना कायद्याचा, अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांचा, पदाधिकाऱ्यांना नगरसेवकाचा आणि आयुक्तांना पदाधिकाऱ्यांचा धाक नाही. जो उठतो तो दुसऱ्यावर आरोप करण्यातच मर्दुमकी मानत आहे. आपण कोण आहोत, आपल्यावर जबाबदारी काय, आपण कोणत्या कामासाठी पगार घेतो, त्या पगाराच्या मोबदल्यात आपण खरेच काम करतो का, दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी आपण कोण आहोत, याचा खरा विचार करण्याची शुद्ध कुणाला राहिलेली नाही.
अधिकारी आणि काही नगरसेवकांचे ‘धोरण’ म्हणजेच महापालिका असा व्यवहार सुरू आहे. त्यातून काही पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा अहंकार जोपासला गेला आहे. मी म्हणजे सर्वस्व, अशी नगरसेवकांची धारणा झाली आहे. त्यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा, ज्येष्ठ नगरसेवकांचा धाक राहिलेला नाही. कुणाला काहीही बोललो तरी काय फरक पडतो. आयुक्तांच्या दालनात वाटेल तेव्हा शिरेन, त्यांना कशाबद्दलही जाब विचारेन, ही दादागिरी सुरू आहे. दुसरीकडे आयुक्तांसारख्या सर्वोच्च पदावरील माणसेही दुसऱ्या गावातून गुंड आणून हातपाय तोडण्याच्या धमक्या देतात
. तेव्हा त्यांनी साऱ्या भिंती पाडल्याचे स्पष्ट होतेच. त्यांनी खरेच केणेकरांना धमकावले असेल तर, त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन सरकारने त्यांना गुंडांच्या टोळीतच पाठवावे. मात्र, महाजन गेले आणि दुसरे कुणी आले किंवा केणेकरांच्या जागी दुसरे नगरसेवक असले तर मनपाच्या कारभारात काही फरक पडणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर "नाही' असेच येते. कारण महापालिकेत अलीकडे होत असलेल्या वादाचे मूळ व्यक्ती नव्हे तर प्रवृत्तीमध्ये आहे. यापूर्वीच्या अनेक आयुक्तांची नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत अंगावर धावून जाण्यापर्यंत भांडणे झाली. नंतर ती पाच मिनिटांत शमली. दोघांनीही आपापली चूक मान्य करत माघार घेतली. कारण दोन्ही बाजूंनी वरिष्ठांचा धाक होता. आता कुणी माघार घ्यावी, यावरूनच शिवीगाळ होते. लोकांनी आपल्याला त्यांची कामे करण्यासाठी पाठवले आहे, याचा विसर पडला की हे होणारच. महाजन यांना औरंगाबादेतून बदली हवी आहे म्हणून ते वादाची निमित्ते शोधत आहेत, असे म्हटले जाते.
भाजपला महाजन नको आहेत. त्यांची बदली करा, यासाठी त्यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. बदलीसाठी निमित्त म्हणून भाजपने भांडखोर केणेकरांना मुद्दाम आयुक्तांच्या दालनात पाठवले अशीही चर्चा आहे. यातील खरे-खोटे लवकरच सर्वांसमोर येईल. कदाचित भाजपच्या रेट्यामुळे आणि औरंगाबाद नकोच असा हट्ट असल्यामुळे महाजनांची बदली होईल. पण याने खरेच काही चांगला बदल होणार का? कदाचित एखादा चांगला अधिकारी येईलही; पण त्याला काम करू देत, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून, औरंगाबाद सुंदर, स्वच्छ करण्याची नगरसेवकांची इच्छा आहे काय?