आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीमंत दामोदरपंत’चा आज वाचकांसाठी प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्व स्तरातील वाचकांशी विश्वास आणि आपुलकीचे नाते निर्माण करणार्‍या दैनिक ‘दिव्य मराठी’चा चौथा वर्धापन दिन २९ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वाचक, रसिकांसाठी ‘दिव्य मराठी’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात प्रख्यात चित्रपट, नाट्य अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘श्रीमंत दामोरदरपंत’ या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (१५ मे) आयोजित करण्यात आला आहे.

वाचकांना वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने बौद्धिक, वैचारिक, खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ रोजी सायंकाळी साडेचार वाजता सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृहात ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे भन्नाट विनोदी नाटक सादर केले जाणार आहे.

मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते भरत जाधव यांनी स्थापन केलेल्या भरत जाधव एंटरटेन्मेंटने या नाटकाची निर्मिती केली आहे. तरुण पिढीतील प्रतिभावान दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या नाटकाने राज्यभरातील नाट्यरसिकांना खळखळून हसवले आहे.

‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद आवृत्तीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ११ मेपासून विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये १२, १३ मे रोजी प्रख्यात संशोधक, संपादक आनंद हर्डीकर यांची ‘नेताजी तुम्ही कुठे आहात?’ ही दोनदिवसीय व्याख्यानमाला झाली. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. तसाच शुक्रवारी होणार्‍या नाटकासही द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फक्त पास, प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश
भरत जाधव यांच्या अभिनयामुळे गाजत असलेल्या ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाटकाची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘दिव्य मराठी’तर्फे पास, प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गुरुवारीच त्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी नाट्यगृहात फक्त पास, प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याची रसिक, वाचकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...