आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रुती भागवत खून : एका बड्या पोलिस अधिकाऱ्यावर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चार वर्षांपूर्वीच्या श्रुती भागवत खून प्रकरणात एक बडा पोलिस अधिकारी गुंतला अाहे. या पोलिस अधिकाऱ्याला प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पोलिस तपास यंत्रणेने मदत केली. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची त्या वेळी कसून चौकशी केलीच नाही, अशी खळबळजनक बाब समोर आली आहे. आता या प्रकरणाची २२ ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे, संगीतराव पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
उल्कानगरी, जवाहर कॉलनी येथे श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रुती यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी निर्घृण खून झाला होता. त्यातील आरोपीला गजाआड करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. श्रुती यांचे बंधू मुकुल करंदीकर यांनी सीबीआय तपासाच्या मागणीसाठी जुलै महिन्यात याचिकाही दाखल केली. त्यात पोलिस आयुक्त, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, गृहसचिवांना प्रतिवादी केले आहे. शिवाय मुख्यमंत्री, पोलिस महासंचालकांकडे चार वर्षांपासून पाठपुरावाही केला. त्याची दखल घेत पोलिस महासंचालकांनी आदेश दिले आणि तपासासाठी विशेष पथक स्थापन झाले. न्यायालयानेही २२ ऑगस्टपासून सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पुरावेच नष्ट केले : यासंदर्भात करंदीकर यांची बाजू मांडणारे अॅड. अभयसिंह भोसले यांनी सांगितले की, मुळातच या प्रकरणाचा तपास पोलिसांनी प्रारंभापासून गांभीर्याने केला नाही. खून झाल्याचे कळाल्यावर पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेथे एका बड्या पोलिस अधिकाऱ्याचे कपडे होते. तसेच पुरुषांचे कपडे शिवणाऱ्या एका टेलरच्या दुकानाची पावती होती. हा अधिकारी खुनात गुंतला असावा, असा आमचा संशय आहे. तो आम्ही पोलिसांकडे व्यक्तही केला. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. शिवाय ती पावती तपासातीलच एखाद्या अधिकाऱ्याच्या खिशातील असावी, असे सांगत ती नष्ट करण्यात आली. हा अधिकारी औरंगाबादबाहेरील होता आणि तो त्या काळात औरंगाबादेत मुक्कामासाठी आला होता, अशीही माहिती मिळाली आहे.
करंदीकर यांची मूळ मागणी सीबीआय चौकशीची आहे, तरीही पोलिस महासंचालकांच्या आदेशावरून पथक स्थापन झाले. परंतु या पथकात गुंतागुंतीच्या खून प्रकरणांचा छडा लावण्याचा अनुभव असलेले अधिकारी असणे अपेक्षित होते. तसे झालेले नाही, असेही अॅड. भोसले यांचे म्हणणे आहे.

मोलकरणीचे काय?
श्रुतींकडे मोलकरीण कामाला होती. तिची तत्कालीन पोलिस उपायुक्त सुनीता ठाकरे यांनी चार दिवस चौकशी केली. चौकशीनंतर ती औरंगाबादेत नाही. तिच्याकडे महत्त्वाची माहिती असावी, असे वाटते.

डीएनए टेस्ट कशासाठी?
पोलिसांनी श्रुती भागवत यांची डीएनए टेस्टही केली. आरोपीच पोलिसांच्या ताब्यात नसताना ही टेस्ट कशासाठी करण्यात आली, असाही सवाल करंदीकर यांच्या वतीने अॅड. भोसले यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...